केडीएमटीच्या बसला आग; देखभाल दुरूस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
By प्रशांत माने | Published: December 29, 2023 07:45 PM2023-12-29T19:45:14+5:302023-12-29T19:45:30+5:30
बस थांब्याच्या ठिकाणी उभी असताना गाडीतून अचानक धूर येऊ लागला काही क्षणातच बसच्या खालच्या बाजुला आग लागली.
डोंबिवली: केडीएमटीच्या बसला किरकोळ आग लागल्याची घटना आज संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास लोढा-पलावा येथील बसथांब्याच्या ठिकाणी घडली. शेवटचा स्टॉप असल्याने बसमध्ये फारसे प्रवाशी नव्हते.
बस थांब्याच्या ठिकाणी उभी असताना गाडीतून अचानक धूर येऊ लागला काही क्षणातच बसच्या खालच्या बाजुला आग लागली. आग लागताच तत्काळ बाजुकडील पलावा अग्निशमन केंद्राला याची माहीती दिली गेली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबगाडीसह घटनास्थळी धाव घेत काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळविले. ८ डिसेंबरला गणेशघाट आगारातील दोन बस ला शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत त्या जळून खाक झाल्याची घटना घडली होती. आज पुन:श्च एकदा लोढा-पलावा याठिकाणी बस ला शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडल्याने बसच्या देखभाल दुरूस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.