खोणी शिरढोण म्हाडा रहिवाशांनी केला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सत्कार
By मुरलीधर भवार | Published: October 3, 2023 07:08 PM2023-10-03T19:08:36+5:302023-10-03T19:09:05+5:30
खासदारांच्या पाठपुराव्यामुळे दोन हजार रहिवाशांना मिळाला होता दिलासा. घराचा शेवटचा हप्ता माफ झाल्याने वाचले होते ३२ कोटी रुपये.
कल्याण- माझ्याकडे मदत मागण्यासाठी आलेली व्यक्ती ही माझा मतदार आहे का हे मी कधीच पाहत नाही, आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत सर्वांना केली जाते. माझ्या कामातून बाळासाहेबांची, दिघे साहेबांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
खासदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या खोणी - शिरढोण येथील म्हाडा वसाहतीमधील दोन हजार नागरिकांचा घराचा शेवटचा हप्ता माफ करण्यात आला होता. यामुळे त्यांचें ३२ कोटी रुपये वाचले होते. यासाठी खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह म्हाडाकडे पाठपुरावा केला होता. या सत्कार समारंभात काही रहिवाशांना प्रतिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या तसेच काही रकमेचा धनादेशही देण्यात आला.
म्हाडामार्फत नागरिकांना किफायतशीर दरात घरे दिली जातात. याच योजेतून कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण तालुक्यात परवडणाऱ्या दरातील घरे उभारण्यात आली होती. या घरांसाठीची २०१८ मध्ये सोडत काढण्यात आली होती. त्यात २०२१ पर्यंत विजेत्यांना घराचा ताबा देणे अपेक्षित होते. कोरोनामुळे ही प्रक्रिया धीम्या गतीने राबविली गेली. त्यामुळे लाभार्थ्यांना घरांचा ताबा वेळेत मिळाला नाही. ताबा न मिळालेल्या घरांचा हप्ता तर दुसरीकडे ज्या घरात भाड्याने राहतो त्या घराचे भाडे अशा दुहेरी आर्थिक कोंडीमध्ये हे लाभार्थी सापडले होते. या आर्थिक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी रहिवाशांनी खासदार शिंदे यांची भेट घेतली होती.
खासदार डॉ. शिंदे यांनी रहिवाशांच्या मागणीनुसार घराचा शेवटचा हप्ता माफ करण्यात यावा अशी विनंती म्हाडा प्रशासनाला केली होती. याबाबत त्यांनी कोकण गृहनिर्माण महामंडळआणि म्हाडा समवेत अनेक वेळा बैठका घेत पत्रव्यवहारही केला होता. म्हाडाने काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या घराचा शेवटचा हप्ता माफ केला. यामुळे दोन हजार नागरिकांना दिलासा मिळाला. त्यांचे तब्बल ३२ कोटी रुपये वाचले होते.