मित्राच्या आईची हत्या; दोघांना सक्त मजुरीची शिक्षा, कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Published: June 19, 2023 07:16 PM2023-06-19T19:16:12+5:302023-06-19T19:16:23+5:30
न्यायालयाचे न्या. आर. जी. वाघमारे यांनी सोमवारी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
कल्याण : मित्राच्या आईची गळा चिरून हत्या करत घरातील सोन्याचा ऐवज घेऊन पोबारा करणाऱ्या वीरेंद्र अजय नायडू (३०) व अश्विनी कुणाल अशोक सिंह (३०, दोघे रा. अंबरनाथ) या दोघांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. जी. वाघमारे यांनी सोमवारी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वीरेंद्र व अश्विनी या दोघांनी मिळून त्यांच्या मित्राच्या आईची कटरच्या सहायाने गळा कापून हत्या केल्याची घटना सन २०१४ मध्ये घडली होती. महिलेची हत्या केल्यानंतर घरातील सोन्याचा ऐवज घेऊन दोघांनी तेथून पोबारा केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वीरेंद्र व अश्विनी या दोघांना पोलिसांनी अटक केली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे यांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र सादर केले. सहायक सरकारी वकील म्हणून सचिन कुलकर्णी व संजय गोसावी यांनी कामकाज पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून नंदकुमार कदम, संजय चौधरी व कैलास वाजे यांनी त्यांना मदत केली.