किरकोळ वादातून हत्या; पिसवली टाटा पॉवर हाऊस परिसरातील घटना
By प्रशांत माने | Published: June 26, 2023 03:40 PM2023-06-26T15:40:06+5:302023-06-26T15:40:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: किरकोळ वादातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुर्वेकडील पिसवली टाटा पॉवर हाऊस नाका परिसरात रविवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: किरकोळ वादातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुर्वेकडील पिसवली टाटा पॉवर हाऊस नाका परिसरात रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. दरम्यान मानपाडा पोलिसांकडून तासाभरात आरोपीला अटक करण्यात आली. किरण प्रभाकर शिंदे (वय २५) रा. महात्मा गांधी नगर, पिसवली असे आरोपीचे नाव आहे. शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहीती मानपाडा पोलिसांनी दिली.
टाटा पॉवर हाऊस परिसरात राहणारा आणि व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या शैलेश शिलवंत उर्फ बाळा (वय ३२) याची नाका कामगार असलेल्या किरण शिंदे याच्याशी ओळख होती. दोघेही एकाच परिसरात राहत होते. रविवारी दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. त्या वादातून किरणने त्याच्याकडील चाकूने शैलेशवर सपासप वार केले. यात शैलेश गंभीर जखमी झाला मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला.
थरार सीसीटिव्हीत कैद
चाकूने शरीरावर ठिकठिकाणी वार केल्यावर शैलेश जीव वाचविण्यासाठी काही अंतरापर्यंत पळत गेला. आरोपी किरण हा देखील त्याच्या पाठीमागे पळत होता. हा सर्व थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
औरंगाबादला पळून जायच्या आधीच आरोपीला ठोकल्या बेडया
घटनेची माहीती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता कोणी काहीच माहीती दिली नाही. मात्र सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपी किरणला तासाभरात अटक केली. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे, दत्तात्रय सानप, ज्ञानोबा सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, सुनिल पवार, दिपक गडगे, पोलिस नाईक शांताराम कसबे, यलप्पा पाटील, पोलिस शिपाई अशोक आहेर, विजय आव्हाड, महेंद्र मंजा, मिनीनाथ बढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपी गुन्हा करून औरंगाबाद येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात याआधी दुखापती करण्याचे दोन तर विनयभंगाचा १ गुन्हा दाखल असल्याची माहीती पोलिस निरीक्षक मदने यांनी दिली.