श्रीकांत शिंदेंविरोधात किसन कथोरे मैदानात?; कपिल पाटील यांच्यासोबतचा संघर्ष नडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:41 AM2023-09-07T06:41:03+5:302023-09-07T06:41:38+5:30
लोकसभा निवडणुकीत भिवंडी आणि कल्याण दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा महाविकास आघाडीने निर्धार केला.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याशी संघर्ष सुरू असल्याने त्रस्त असलेले भाजपचे आमदार किसन कथोरे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गटाने दिला असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. खुद्द कथोरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार शिवसेनेकडून करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत भिवंडी आणि कल्याण दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा महाविकास आघाडीने निर्धार केला. ठाकरे यांनी मातोश्रीवर महिनाभरात दोन वेळा बोलावलेल्या बैठकीत कथोरे यांच्या नावाची चर्चा झाली. कथोरे यांची थेट पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात आव्हान द्यायची इच्छा असेल तर भिवंडी मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला जाईल. कथोरे यांनी कल्याणमधून निवडणूक लढवावी, अशी ठाकरे यांची इच्छा आहे.जिल्हा नियोजन समितीत कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्यांच्या मतदारसंघात बाहेरील आमदार ढवळाढवळ करीत असल्याचे सांगताच खा. पाटील यांनी भोईर यांना आ. कथोरे यांचे नाव घ्यायला भाग पाडले.
कल्याण, भिवंडी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांपैकी कोणत्याही ठिकाणी मी लढावे, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांची इच्छा आहे. दोन्ही बैठकीत त्यांनी माझ्या नावाची कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे मलाही खात्रीलायक सांगण्यात आले. पण, मी काहीही झाले तरी भाजपचाच आहे, हे नक्की.
- किसन कथोरे, भाजप आमदार.
महिनाभरात दोन वेळा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी कल्याण, भिवंडी लोकसभेसाठी बैठक घेतली. दोन्ही वेळेस त्यांनी येथे आघाडीचा उमेदवार असेल, हे स्पष्ट केले. तो कोण असेल हे जरी सांगितले नसले, तरी तळागाळातला शिवसैनिक हा शिंदे गटासोबत नाही. श्रीकांत शिंदे शिवसैनिकांमुळे जिंकले होते. त्यामुळे विजय ठाकरे गटाचाच होईल.
- विवेक खामकर, डोंबिवली शहरप्रमुख, शिवसेना उद्धव ठाकरे गट
कथोरे यांचा जनसंपर्क उत्तम असून, कल्याण लोकसभेतील ते ज्येष्ठ आमदार असून, त्यांचे सर्व ठिकाणच्या नगरसेवक, नगराध्यक्ष, सभापती यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही कथोरे यांचे उत्तम संबंध आहेत.