मदतीची हात देणारी कोल्हापूरकरांची ‘का रे भावा’ची साद
By मुरलीधर भवार | Published: June 4, 2023 01:19 PM2023-06-04T13:19:10+5:302023-06-04T13:19:31+5:30
कल्याण शहराच्या पूर्व भागातील चिंचपाडा-नांदिवली परिसरात पोटापाण्याच्या निमित्ताने आलेल्या कोल्हापूरवासीयांची मोठी लोकवस्ती आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण शहराच्या पूर्व भागातील चिंचपाडा-नांदिवली परिसरात पोटापाण्याच्या निमित्ताने आलेल्या कोल्हापूरवासीयांची मोठी लोकवस्ती आहे. या कोल्हापूरवासीयांनी कल्याणमध्ये राहून कोल्हापूरचे रांगडेपण जपले आहे. ‘का रे भावा’ हा त्यांचा परवलीचा आणि प्रेमाची साद घालणारा शब्द. ही साद ऐकू आली, की कोल्हापूरकर एकमेकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात. तीच परंपरा कल्याणच्या ‘कोल्हापूर शिव शाहू प्रतिष्ठान’ने जपली आहे.
चिंचपाडा-नांदिवली परिसरात कोल्हापूरमधील आजरा, चंदनगड, शाहूवाडी या तालुक्यातील अनेक लोक राहतात. जवळपास सात हजार कोल्हापूरवासीयांची ही वस्ती आहे. यापैकी काही जण हे खासगी कंपनीत, तर काही जण पोलिस, सुरक्षा महामंडळ, सरकारी नोकरीत आहेत. काही जणांचा व्यवसाय हा ड्रायव्हिंगचा आहे. कोल्हापूरवासी कल्याणमध्ये राहत असले, तरी त्यांची खरी नाळ ही कोल्हापूरशीच जोडलेली आहे. कोल्हापूरचा अस्सल रांगडा बाज असलेली पंरपरा त्यांनी कल्याणमध्ये राहून जपली आहे. कोल्हापूर शिव शाहू प्रतिष्ठान मदतीच्या उद्देशाने २०१७ साली स्थापन झाले. प्रतिष्ठानचे वयोमान हे फार मोठे नसले, तरी अगदी लहानशा काळात त्यांनी चांगले मदतकार्य करीत समाजाला दिलासा देण्याचे काम केले.
आरोग्य शिबिरांचे आयोजन
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनेकांचे प्राण वाचविण्याचे काम केले जाते. गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. ज्येष्ठ नागरिकांना पॅनकार्ड काढून देण्याचे काम होते. तसेच त्यांना ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र मिळवून देण्याकरिता शिबिर आयोजित केले जाते. त्याचा आजवर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.
वाहतुकीच्या साधनांची सोय
- कोरोना काळात मुंबईहून कोल्हापूर जाण्याकरिता कल्याणमधील कोल्हापूरवासीयांना वाहतुकीच्या साधनांची सोय करून दिली. त्याचबरोबर जे लोक गावी जाऊ शकले नाही, त्यांना रेशन कीट देण्यात आली.
- कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची सोय केली. काही रुग्णांचे उपचाराचे बिल जास्त झाले होते, ते कमी करण्यासाठी हातभार लावला. कोरोनाच्या अगोदर २०१९ मध्ये अतिवृष्टीचा फटका पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात बसला. त्यातही कोल्हापूर जिल्ह्याला जास्त बसला होता. त्यांच्या मदतीसाठी कल्याणमधील कोल्हापूरवासी धावले.
- एक टेम्पो भरून अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, औषध गोळ्या, चटई, चादरी आदी साहित्य पुरविण्यात आले होते.
प्रतिष्ठानची कार्यकारिणी
अध्यक्ष : रमेश रेडेकर
आधारस्तंभ :
सुरेश ढोणूक्षे,
तानाजी भिऊगडे
उपाध्यक्ष : श्रीधर दाभोळे
सचिव : ईश्वर जोंधळे
खजिनदार :
महादेव बिरंजे
कार्याध्यक्ष : संतोष माने
सल्लागार : सुनील सावेकर, श्रीरंग गवेकर, दशरथ कोंडुस्कर,
अभी साठे