गणेश चतुर्थीच्या आधी खुला होणार कोपर पूल, दिपेश म्हात्रेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:30 PM2021-07-27T16:30:34+5:302021-07-27T17:06:49+5:30
Kopar bridge : पूलाच्या कामासाठी ऑक्सीजनची कमतरता भासल्याने पूलाच्या कामाचा वेग मंदावला होता. आता या पूलाच्या कामाला गती देण्यात आली आहे.
कल्याण : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाण पूल गणेश चतुर्थीच्या आधी खुला होणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आज दिली. पूलाचा स्लॅब सिमेंट कॉन्क्रीटीकरणाने भरण्याच्या कामास माजी नगरसेवक म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी भाजप माजी नगरसेवक मंदार हळबे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी अशुतोष येवले आदी उपस्थित होते. कोपर पूल हा तयार करुन तो नागरीकांना 15 जुलै रोजी खुला केला जाईल अशी डेडलाईन प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. पूलाच्या कामासाठी ऑक्सीजनची कमतरता भासल्याने पूलाच्या कामाचा वेग मंदावला होता. आता या पूलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. पूल वाहतूकीसाठी खुला झाल्यावर ठाकूर्ली रेल्वे उ्डाणपूलावरील वाहतूकीचा ताण कमी होणार आहे.
कोपर हा पूल डोंबिवलीसाठी महत्वाचा पूल आहे. हा पूल धोकादायक झाल्याने रेल्वे आणि महापालिकेने संयुक्तीक निर्णय घेऊन पूल वाहतूकीसाठी बंद केला. त्यानंतर पूलाच्या कामासाठी महापालिका आणि रेल्वेने निम्मा खर्च उचलला. जवळपास 10 कोटी रुपये खर्च करुन हा पूल तयार केला जात आहे. कोरोनामुळे या पूलाच्या कामाचा वेग मंदावला होता. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झालेला असताना हा पूल पाडून पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.
पूलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूलाचा स्लॅब सिमेंट कॉन्क्रीटीकरणाने भरल्यावर पूलाचे काम पूर्णत्वास येईल. त्यानंतर हा पूल वाहतूकीसाठी खुला केला जाईल. या पूलाच्या कामावर देखरेख ठेवून असलेले प्रकल्प अभियंते तरुण जुनेजा यांनी सांगितले की, ऑगस्ट अखेर्पयत पूलाची सर्व कामे मार्गी लावली जातील.