कोपर उड्डाणपूल जानेवारीपर्यंत खुला; केडीएमसी प्रशासनाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:12 AM2020-12-05T00:12:42+5:302020-12-05T00:12:50+5:30
पिलर उभारण्याचे काम सुरू
डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या नवीन कोपर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असून, जानेवारी २०२१ अखेरपर्यंत तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट केडीएमसी प्रशासनाचे आहे. दरम्यान, पुलाच्या परिसरातून जाणाऱ्या विद्युतवाहिन्यांचे ‘पुश-थ्रू’द्वारे भूमिगत करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच पिलरचे काम सुरू असून, ते बरेचसे होणे बाकी असल्याने जानेवारीअखेरची डेडलाइन पाळली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोपर पूल कमकुवत झाल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचा अहवाल मुंबई आयआयटीने रेल्वेला दिला होता. त्यानुसार, तेथे १५ सप्टेंबर २०१९ पासून वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान, पुलासाठी रेल्वेकडून परवानगी मिळण्यास लागलेला विलंब, कंत्राटदाराची नियुक्ती यात पुलाचे काम तातडीने सुरू होऊ शकले नाही. प्रत्यक्ष कामाला १७ मार्चपासून सुरुवात झाली. त्यात लॉकडाऊनमध्ये रेल्वे बंद झाल्याने १५ दिवसांत पुलाच्या कामाचा महत्त्वाचा भाग केडीएमसीला पूर्ण करता आला. पुलाची सर्व कामे वेळेत पूर्ण करून हा पूल नोव्हेंबर २०२० पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जुलैअखेरीस पाहणी दौऱ्यात व्यक्त केले होते. परंतु, काही कामांना झालेला विलंब पाहता आता जानेवारीअखेरपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पत्रीपुलाच्या सध्या सुरू असलेल्या कामादरम्यानही खासदारांनी जानेवारीअखेरपर्यंत पूल सुरू होईल, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, संथगतीने सुरू असलेल्या कामाचा वाहतुकीला मोठा फटका बसत असून, त्याचा सर्व ताण ठाकुर्ली उड्डाणपुलावर पडत आहे. तेथील अरुंद रस्ते पाहता सकाळ व सायंकाळी नेहमीच वाहतूककोंडी होते. काही दिवसांपूर्वी तेथे वाहनचालकांमध्ये हाणामारीचा प्रकारही घडला होता. या एकूणच परिस्थितीमुळे वाहतूक पोलीसही त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर कोपर पुलाचे काम मार्गी लावून वाहतूक सुरू करावी, अशी पत्रे प्रशासनाला देण्यात आली आहेत.
विद्युतवाहिन्यांची कामे प्रलंबित असून पिलरचे काम सुरू झाले आहे. पुलाचे काम प्रगतिपथावर असून जानेवारीअखेरपर्यंत काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आमचे नियोजन आहे.- सपना कोळी-देवनपल्ली, शहरअभियंता, केडीएमसी