अमूदान स्फोट प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
By मुरलीधर भवार | Published: May 27, 2024 04:40 PM2024-05-27T16:40:12+5:302024-05-27T16:42:15+5:30
अपघातग्रस्त अमूदान कंपनीच्या ठिकाणी कामगार मंत्री खाडे यांनी आज दुपारी भेट दिली.
मुरलीधर भवार, डोंबिवली:डोंबिवली एमआयडीसीतील अमूदान या रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी दोषी अधिकारी वर्गाच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहे.
अपघातग्रस्त अमूदान कंपनीच्या ठिकाणी कामगार मंत्री खाडे यांनी आज दुपारी भेट दिली. या वेळी त्यांनी कंपनी परिसराची पाहणी केली. कामगार मंत्री खाडे यांनी सांगितले की, कंपनीतील रिअॅक्टरमुळे हा स्फाेट झाला आहे. हे प्रथमदर्शनी आढळून येते. त्याठिकाणी बॉयलरचा काही संबंध नाही. कंपनतीली रिॲक्टर कसा आणि का फुटला याची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत अधिकारी दोषी आढळून आल्यास त्यांच्या विराेधात कारवाई केली जाणार आहे. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६४ जण जखमी झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच जाहीर केले आहे. जे कामगार मृत या स्फेटात मृत्यूमुखी पडले. त्यांचे वय आणि त्यांची कंपनीतील सेवा वर्षे याची माहिती घेऊन कंपनी मालकाकडून त्यांना त्यांचे लाभ देण्यासाठी कामगार आयुक्त विभागाकडून आदेशित केले जाणार आहे. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की त्याठिकाणी एक मोठा खड्डा पडला आहे. तसेच आसपासच्या सात कंपन्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्या कंपन्यातील कामगारही मृत्यूमुखी तर काही जखमी झाल्याची माहिती आहे .
अपघातग्रस्त अमूदान कंपनीचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते का ? हा प्रश्न खाडे यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, सेफ्टी ऑडिट झाले होते असे त्यांनी सांगितले. मात्र झाले होते की नाही ते तपासले जाईले असेही ते म्हणाले. दर दोन वर्षांनी कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट केले जाते. त्यात काही त्रूटी आढळून आल्यास त्या त्रूटी दूर करण्सास सांगितले जाते. त्या त्रूटी दूर केल्या नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. सेफ्टी ऑडिटची प्रक्रिया सुरु असते. आत्ता अमूदान कंपनीतील स्फोटाच्या घनटेनंतर पुन्हा कंपन्यांनी सेफ्टी ऑडिट केले गेले आहे की नाही हे तपासले जाईल.
डोंबिवलीतील १५६ कंपन्या धोकादायक आहेत. त्या अन्यत्र हलविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतला होता. त्याचे पुढे काय झाले याची विचारणा खाडे यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले की, धाेकादायक कंपन्या अन्यत्र हलविण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. मात्र कंपन्या अन्यत्र हलविणे कंपनी मालकांना सोयस्कर आहे की नाही हे देखील जाणून घेतले जाणार आहे.