मजूर मृत्यू प्रकरण, बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल
By प्रशांत माने | Published: September 22, 2022 07:28 PM2022-09-22T19:28:39+5:302022-09-22T19:30:18+5:30
नवीन संरक्षक भिंत बांधण्याचे १२ मजूरांकडून काम सुरू होते. काम चालू असताना त्याठिकाणी अस्तित्वात असलेली जूनी संरक्षक भिंत अचानक कोसळली आणि त्याच्या ढिगा-याखाली पाच मजूर अडकले.
डोंबिवली येथील पश्चिमेकडील कोपररोड सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरातील रेल्वेच्या जागेतील १२ फूट उंचीची जूनी संरक्षक भिंत अंगावर कोसळून दोन मजूरांचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली होती. दरम्यान याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून बांधकाम करण्याचे कंत्राट दिलेल्या मुंबईतील शिवा एंटरप्रायझेस कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे. अटी शर्तीचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला गेला आहे.
नवीन संरक्षक भिंत बांधण्याचे १२ मजूरांकडून काम सुरू होते. काम चालू असताना त्याठिकाणी अस्तित्वात असलेली जूनी संरक्षक भिंत अचानक कोसळली आणि त्याच्या ढिगा-याखाली पाच मजूर अडकले. यात मल्लेश चव्हाण (वय ३५) आणि बंडू गोवासे (वय ६०) या दोघा मजूरांचा मृत्यू झाला तर विनायक चौधरी (वय ४२), माणिक पवार (वय ६०), युवराज वेडगुत्तलवार (वय ४५) असे तिघे मजूर जखमी झाले. रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधण्याचे कंत्राट शिवा एंटरप्रायझेसला दिले होते. ज्याठिकाणी हे काम चालू होते त्याठिकाणी जूनी संरक्षक भिंत न तोडता त्याच्या लगतच नवीन बांधकामासाठी जून्या भिंतीलगतच खड्डा खणला जात होता. काम चालू असताना त्याचा धकका जून्या भिंतीला लागून ती अंगावर कोसळू शकते आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो ही जाणीव असतानाही मजूरांना धोकादायक परिस्थितीत काम करावयास लावून तसेच त्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही साधनसामुग्री पुरविली नाही. यात मजूरांच्या मृत्यूस आणि जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका शिवा एंटरप्रायझेस कंपनी आणि त्यांच्या संबंधित व्यक्तींवर ठेवण्यात आला आहे.
दोघांची प्रकृती स्थिर
युवराज वेडगुत्तलवार, माणिक पवार आणि विनायक चौधरी या जखमी मजूरांना केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. वेडगुत्तलवार हे किरकोळ जखमी झाले होते दरम्यान पवार आणि चौधरी हे दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना बुधवारी रात्री उशीरा मुंबई, शीव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार घेणाऱ्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहीती शास्त्रीनगर रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ दीपा शुक्ल यांनी दिली.