दामदुप्पट करण्याच्या नावाने लाखोंचा गंडा
By सचिन सागरे | Published: March 31, 2024 06:22 PM2024-03-31T18:22:29+5:302024-03-31T18:23:04+5:30
याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
डोंबिवली: शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील तिघांनी संगनमत करून त्यांना कर्ज म्हणून दिलेल्या रकमेची परतफेड करायची असल्याची बतावणी करत एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पश्चिमेकडील महात्मा फुले रोड परिसरात राहणाऱ्या रश्मी कदम (६१) यांच्याकडे डिसेंबर २०१२ मध्ये शेजारी राहणाऱ्या विधीषा कांदळगावकर (६६) आल्या होत्या. यावेळी, पतीने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कदम यांच्याकडे विधीषा यांनी पैशांची मागणी केली. विधीषा यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत ७ लाख ९० हजार रुपये कदम यांनी दिले. त्यानंतर, जानेवारी २०१५ मध्ये एका खाजगी व्यापाऱ्याकडे गुंतवणूक केल्यास सदरची रक्कम एका वर्षाच्या आत दाम दुप्पट करून देण्याचे आमिष कदम यांना दाखवले.
या बोलण्यावर विश्वास ठेवून कदम यांनी पुन्हा २ लाख ५१ हजार रुपये विधीषा यांना दिले. यापैकी सन २०१९ मध्ये विधीषा यांनी १ लाख ६४ हजार रुपये कदम यांना परत केले. उर्वरित ८ लाख ७७ हजार रुपये परत न देता त्या पैशांचा अपहार केला. तसेच, पैशांची मागणी केली असता धमकी देण्यात येत असल्याची तक्रार कदम यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी कदम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विधीषा, तिचा पती विलास (६७) आणि मुलगी सायली काटे (३१) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.