कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गाचे 50 टक्केच भूसंपादन; १३ वर्षांपासून केंद्र, राज्य शासन समन्वयाच्या अभावाचा फटका
By अनिकेत घमंडी | Published: July 20, 2024 06:19 AM2024-07-20T06:19:59+5:302024-07-20T06:20:20+5:30
या गतीने काम होणार असेल तर आणखी दहा वर्षे लागतील.
डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या मार्गाचे १३ वर्षांत अवघे ५० टक्केच भूसंपादन झाले आहे. केंद्र, राज्य शासन त्या मार्गाचा विकास करण्यात हात आखडता घेत आहे, असा आरोप कल्याण-कसारा व कर्जत (के-थ्री) या रेल्वे प्रवासी संघटनेने केला. त्यांनी याबाबत दिल्लीत रेल्वे बोर्डाकडे माहिती मागवली असता कामाच्या कूर्मगतीचे गुपित उघड झाले. या गतीने काम होणार असेल तर आणखी दहा वर्षे लागतील.
संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले की, सातत्याने पाठपुरावा करूनही माहिती दिली जात नाही. त्यामुळे कल्याण-कसारा तिसरा मार्ग कुठे अडकला? स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवली जात असताना नेमके घोडे अडले कुठे, असा सवाल त्यांनी केला. कल्याण-कसारा या ६७.३५ किलोमीटर मार्गावर तिसऱ्या लाइनला २०११ मध्ये मंजुरी मिळाली, त्यासाठी सुमारे १४३५.६१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पत्रात म्हटले आहे. केवळ ५० टक्के भूसंपादन काम झाले असून, अजून काम सुरू असल्याचे घनघाव म्हणाले.
गेल्या १३ वर्षांत कामाची फारशी प्रगती झालेली नसून ही विकासाच्या दृष्टीने वाटचाल नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला न्याय मिळायला हवा, इथला प्रवासी पिचला जात असून त्याला होणारा त्रास, वेदना त्याचे काहीच मूल्यमापन नाही का, अशा शब्दांत घनघाव यांनी नाराजी व्यक्त केली.
...तरच जलद लोकल
कल्याण-कसारा चौथी लाइनबाबत मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन काम बघत असून त्यांचेही काम सुरू असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच कल्याण बदलापूर ३/४ था मार्गाचे काम एमआरव्हीसी बघत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अद्याप या मार्गांवरील मार्गिकेचा पत्ता नसल्यानेही कामे कधी होणार, याकडे कोणाचेही लक्ष नाही. गर्दीचे विभाजन होणार तरी कसे? गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्ग वाढवायला हवेत तरच जलद लोकल भविष्यात बदलापूर, आसनगाव मार्गावर धावतील अन्यथा कठीण होईल, असे सांगण्यात आले.