कचरा उचलला न गेल्यानं कल्याणच्या मच्छीमार्केमध्ये आळ्यांचे साम्राज्य; ग्राहकांसह दुकानदारचंही आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 02:16 PM2021-06-14T14:16:16+5:302021-06-14T14:16:34+5:30
कल्याणच डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्यानं सर्व स्तरातून पालिका प्रशासनाच तोंडभरून कौतुक करण्यात आलं.
कल्याण: मोठा गाजावाजा करत कल्याण पश्चिम येथील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्याच प्रशासनानं जाहीर केलं. मात्र कल्याण डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी कच-याचे ढीग असल्याच दिसून येतंय. कचरा वेळेत उचलला न गेल्यानं मच्छीमार्केटला देखील अवस्था बिकट झालीये. कल्याणच्या छाया टॉकीजजवळील मच्छी मार्केमधला कचरा गेल्या 8 दिवसांपासून उचलला न गेल्याने त्याठिकाणी अक्षरशः आळ्यांचे साम्राज्य पसरलेय. परिणामी याठिकाणी व्यवसाय करणारे मच्छीविक्रेते आणि याठिकाणी खरेदीसाठी येणारे ग्राहक दोघांचेही आरोग्य धोक्यात आलेय. कच-यामुळे ग्राहकांनी मार्केटकडे पाठ फिरवली असून आमच्यावर उपासमारीची वेळ आलीये अस येथील विक्रेत्यांनी सांगितलं.
कल्याणातील महत्वाच्या मार्केटपैकी एक असणाऱ्या या मार्केमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मच्छी, मटण, चिकन विक्री होत असते. साहजिकच त्यामुळे दररोज त्याच्याशी संबंधित टाकाऊ कचराही मोठ्या प्रमाणात पडत असतो. मात्र गेल्या 8 दिवसांपासून हा सर्व कचरा उचललाच न गेल्याने याठिकाणी अक्षरशः प्रचंड प्रमाणात दुर्गंधी तर पसरली आहेच. पण आता त्याजोडीला हा सर्व कचरा सडू लागल्यानं पांढऱ्या रंगाच्या मोठ्या आळ्याही झाल्यात.
कल्याण पश्चिमेला असणारे हे मच्छी मार्केट बरेच जूने असून याठिकाणी 100 हून अधिक मच्छी विक्रेते आणि महिला व्यवसाय करत आहेत. मच्छीबरोबरच याठिकाणी चिकन आणि मटण विक्रीही केली जातेय. यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागाला वारंवार हा कचरा उचलण्यासाठी कळवले. मात्र त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली. याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
कल्याणच डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्यानं सर्व स्तरातून पालिका प्रशासनाच तोंडभरून कौतुक करण्यात आलं. मात्र यामुळे हुरळून गेलेल्या पालिका प्रशासनाने शहरातील इतर कच-याच्या समस्यांकडे देखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा कचऱ्याविरोधातील हे युद्ध जिंकूनही छोट्या छोट्या लढायांमध्ये मात्र पदरी निराशा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी हे सफाई कर्मचारी व इतर कर्मचा-यांना याबाबत खडे बोल सुनावतात का? ते पाहाव लागेल.