ताजा विषय : इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है...

By संदीप प्रधान | Published: December 19, 2022 08:18 AM2022-12-19T08:18:44+5:302022-12-19T08:19:57+5:30

शहरातील सुजाण, सुशिक्षित व संवेदनशील नागरिकांना अस्वस्थ करणारी आकडेवारी उघड झाली आहे.

Latest Topic article on incidents happened in kalyan dombivali cities crime rate increased | ताजा विषय : इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है...

ताजा विषय : इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है...

Next

संदीप प्रधान,
वरिष्ठ सहायक संपादक

डोंबिवली, ठाणे ही शहरे सांस्कृतिकदृष्ट्या गेल्या पंधरा वर्षांतील केंद्रे. अनेक जिनियस या शहरांत राहतात. एकेकाळी गिरगाव, दादर येथे होणारे साहित्यिक, सांस्कृतिक सोहळे आता याच शहरांत होतात. या शहरातील सुजाण, सुशिक्षित व संवेदनशील नागरिकांना अस्वस्थ करणारी आकडेवारी उघड झाली आहे. थुंकताना अंगावर थुंकी उडाली म्हणून जीव घेतला. मोटारसायकल उभी करताना धक्का लागला म्हणून जबर जखमी केला, अशा घटना डोंबिवलीत वाढल्या आहेत. ठाण्यातही अशा घटनांची कमतरता नाही. डोंबिवलीत ११ महिन्यांत किरकोळ वादावादीतून जिवावर उठण्याचे किंवा हिंस्र प्रतिक्रिया देण्याचे ३९९ गुन्हे नोंदले गेले. ठाण्यातील पोलिसांनी आकडेवारी जाहीर केली नसली तरी डोंबिवलीसारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे येथील लोकांना नेमके झाले आहे काय, असा प्रश्न पडतो.

डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर व ठाण्यातील दूरचा परिसर हा डॉर्मेटरी सिटी असाच आहे. येथे वास्तव्य करणारी ९५ टक्के माणसे पोटासाठी मुंबईकडे जातात. रात्री पाठ टेकायला परत येतात. काहींना तर अगदी बदलापूर, डोंबिवलीहून बोरिवली, दहिसरला रोज जावे लागते. ही माणसे दिवसातील किमान साडेतीन ते चार तास रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी असा प्रवास करतात. मध्य रेल्वेचे रडगाणे बाराही महिने सुरू असते. किरकोळ कारणामुळेही रेल्वे वाहतूक अर्धा तास उशिरा सुरू असते. फलाटावर येणाऱ्या गाडीत प्रवेश मिळवण्यापासून मारामारी सुरू होते. गर्दीमुळे दरवाजातून पडून लोकांचे दररोज दोन-तीन मृत्यू होतात. कोरोनाने गेल्या अडीच वर्षांत तर माणसाचे जीवन बदलून टाकले.

कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार गेले. त्यामुळे बेरोजगारी वाढली व अल्प वेतनात काम करायला कर्मचारीवर्ग उपलब्ध झाला. साहजिकच इतकी यातायात करून चाकरी केल्यावर गरजा भागवण्याएवढे वेतन मिळत नाही, याची सल या परिसरात राहणाऱ्यांच्या मनात कायम असते. डोंबिवली, कल्याणसारख्या शहरात काही लाखांत मिळणाऱ्या घरांची किंमत आता कोटीकोटींची उड्डाणे घेऊ लागलीत. ठाणे शहर तर केव्हाच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे अनेक जण उपनगरातही स्वत:चे हक्काचे घर घेऊ शकत नाहीत. 

मध्यमवर्गाची ही कहाणी तर कोरोना काळात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथे पायी गेलेला गोरगरीब मजूर वर्ग या परिसरात मोठ्या संख्येने आहे. हा वर्ग रेल्वेमार्गालगत झोपड्यांत, रस्त्यावर राहतो. कल्याण रेल्वेस्थानकाजवळील एका टॉवरबाहेर रस्त्यावर राहणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीला एका अशाच बेघर मवाल्याने अलीकडेच उचलून नेले व टॉवरच्या परिसरात बलात्कार करून हत्या केली. 

परराज्यात गुन्हे असलेले, तडीपारीचे आदेश निघालेले अनेक जण ठाणे-डोंबिवली शहरांत येतात. कुठेही, कसेही वास्तव्य करतात. मात्र मूळ गुन्हेगारी पिंड उचल खातो. कोरोनानंतर माणसांची शरीरे दुबळी झाली तशी मनेही कमकुवत झालीत. पारा चढताच ती काटा काढून मोकळी होतात...

Web Title: Latest Topic article on incidents happened in kalyan dombivali cities crime rate increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.