विना परवानगी निवडणूकीचे पोस्टर्स, झेंडे, होर्डिंग्ज लावल्यास कायदेशीर कारवाई; केडीएमसी आयुक्तांचा इशारा
By मुरलीधर भवार | Published: April 24, 2024 05:42 PM2024-04-24T17:42:57+5:302024-04-24T17:43:47+5:30
पोस्टर्स, झेंडे, होर्डिंग्ज आणि बॅनर्स कमानी लावल्यास तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिला आहे.
मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेची परवानगी न घेता निवडणूक विषयक पोस्टर्स, झेंडे, होर्डिंग्ज आणि बॅनर्स कमानी लावल्यास तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिला आहे.
महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे,निवडणूक उपायुक्त रमेश मिसाळ, महापालिकेचे सर्व प्रभागांचे सहाय्यक आयुक्त आणि भिवंडी आणि कल्याण लोकसभ कार्यक्षेत्रातील मंडप कॉन्ट्रॅक्टर्स, मुद्रक, प्रकाशक यांचे समवेत काल सायंकाळी आयोजिलेल्या बैठकीत आयुक्तांनी हा इशारा दिला आहे.
प्रिंटींग प्रेसचे मालकाने, उमेदवारांचे/पक्षाचे साहित्य छपाईची ऑर्डर स्वीकारतांना दोन व्यक्तींच्या ओळखीसह उमेदवाराचे/पक्षाचे प्रतिनिधीचे ओळखपत्रासह प्रचार साहित्याची ऑर्डर स्विकारावी. साहित्य छपाई करतांना एकूण प्रतींची संख्या आणि प्रत्येक प्रतीवर, त्या प्रतीचा अनुक्रमांक असणे आवश्यक आहे. पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्ज/फलक, कमानी प्रिंट करणारे मालक यांनी सुध्दा उमेदवारांचे/पक्षाचे साहित्य छपाईची ऑर्डर स्वीकारतांना दोन व्यक्तींच्या ओळखीसह व उमेदवाराचे/पक्षाचे प्रतिनिधीचे ओळखपत्रासह ऑर्डर स्विकारावी. महापालिकेची रितसर परवानगी घेऊनच पोस्टर्स,बॅनर्स, होर्डिंग्ज/फलक/कमानी लावायची कार्यवाही करावी.
छपाई करण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स , होर्डिंग्ज, फलकआणि कमानी यांच्या प्रत्येक प्रतीवर अनुक्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक आणि कमानी यावर महापालिकेची परवानगी क्रमांक, परवानगीची मुदत, प्रकाशक व पब्लिशर्स यांचे नांव आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रितसर परवानगी घेऊनसुध्दा परवानगी क्रमांक, परवानगीची मुदत, प्रकाशक आणि पब्लिशर्स यांचे नांव आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद न केल्यास ते अनधिकृत आहेत असे समजून कारवाई करण्यात येईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.
ज्या तारखेपर्यंत परवानगी दिली आहे ती मुदत संपताच पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज. फलक, कमानीं व स्ट्रक्चर हे संबंधित एजन्सीनेच काढावयाचे आहे, पब्लिशर्स यांच्यास पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, कमानी झेंडे बनविणाऱ्या एजन्सी यांनी त्यांचे छपाईची संख्या, साईज व याबाबतचा खर्च याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि महापालिकेकडे तातडीने सादर करावी.
सभा मंडप कॉन्ट्रॅक्टर यांनीसुध्दा सभा कार्यक्रम संपताच दुसऱ्या दिवशी उभारलेले स्ट्रक्चर काढून टाकावेत, परवानगी कालावधी संपल्या नंतर कोणतेही पोस्टर, ब’नर्स, होर्डिंग, फलक, कमानी आढळुन आल्यास संबंधिताकडून दंड वसूल करण्यात येईल. त्याचप्रमाणे महापालिकेकडून करारावर जाहिरातीच्या जागा घेतलेल्या एजन्सी मालकांनी कोणतीही निवडणूक विषयक जाहिरात ठराविक एका पक्षाला देण्यात येऊ नये. त्याबाबत उमेदवार/पक्ष यांचे सोबत झालेला करार, त्यासाठी झालेला खर्च याचा तपशील महापालिका आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे तातडीने सादर करणे आवश्यक आहे अशी सूचना आयुक्तांनी केली आहे.