थोडक्यासाठी ॲडमिशन जाते तेव्हा जीव जळतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:41 AM2023-11-21T09:41:47+5:302023-11-21T09:42:08+5:30
मराठा समाजातील तरुण-तरुणींची व्यथा
प्रशांत माने
कल्याण : आम्ही परीक्षेचा मनापासून अभ्यास करतो. जास्तीत जास्त गुण मिळवण्याकरिता घासतो; परंतु अगदी दोन-चार किंवा अर्ध्या गुणाने आम्हाला प्रवेश नाकारला जातो. डोनेशन देऊन प्रवेश घेण्याइतकी आमची ऐपत नाही. त्यामुळे आम्हाला शिक्षणात आरक्षण हवेच, अशी भावना विघ्नेश साळुंखे याने व्यक्त केली. वैष्णव पवार म्हणाला की, मराठा समाजातील विद्यार्थी अभ्यासात, गुणवत्तेत कमी नाहीत; पण हातातोंडाशी आलेली प्रवेशाची संधी गमावतो तेव्हा अक्षरश: रडकुंडीला येतो. माझ्यासारख्या लक्षावधी मुला-मुलींची लढाई मनोज जरांगे-पाटील लढत आहेत. त्यांना पाहायला, ऐकायला आणि त्यांचे हात बळकट करायला आम्ही आलो आहोत.
मराठा समाज आर्थिक मागासलेला असल्याचा अहवाल गायकवाड समितीने दिला आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकाच मराठा समाज पुढारलेला आहे. समाजाची संख्या मोठी असल्याने टक्केवारी अधिक दिसते. समाजातील मुलांना शैक्षणिक आरक्षणाची संधी उपलब्ध झालीच पाहिजे, असे मत नितीन सकपाळ याने व्यक्त केले.
पोटे मैदान दुमदुमले
‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणांनी कल्याण पूर्वेकडील पोटे मैदान दुमदुमले. निमित्त होते मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचे. मोठ्या संख्येने मराठा बांधव आणि भगिनींनी गर्दी केली होती.
शिंदे गटानेही लावला बॅनर
जरांगे-पाटील यांच्या सभेच्या निमित्ताने ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ असे बॅनर मराठा क्रांती मोर्चा कल्याण यांच्या वतीने झळकविण्यात आले होते. एका बॅनरवर खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचे
फोटो होते.
इतर समाजातील तरुणांनाही भुरळ
इतर समाजांमध्येदेखील जरांगे-पाटील यांची क्रेझ आहे. जरांगे-पाटील यांचा चाहता असलेला ओमकार केदारे हा विद्यार्थी भाषण ऐकण्यासाठी आला होता. जरांगे-पाटील हे मांडत असलेली भूमिका रास्त असून, समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे मत त्याने मांडले.