पावसामुळे जनजीवन विस्कळीत; कल्याण-कसारा रेल्वे सेवा ३ तासांपासून ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 09:19 AM2024-07-07T09:19:31+5:302024-07-07T09:19:51+5:30
अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद झाल्याची अनाउन्समेंट रेल्वेकडून करण्यात येत होती.
कसारा दि. ७, शाम धुमाळ : रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रकवर झाड पडल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ३ तासांहून अधिक काळ ठप्प होती. सकाळी ८ वाजता रेल्वे ट्रॅकवरील झाड काढण्यात आल्यानंतर कसाऱ्याकडे वाहतूक लोकल सेवा व मागे अडकलेल्या मेल एक्सप्रेस गाड्या सोडण्यात आल्या. मात्र ३ तासाने सुरु झालेली रेल्वे सेवा लगेचच १५ मिनिटांनी पुन्हा बंद झाली.
वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हार हेड वायरचा पोल खचल्याने रेल्वेचा ओव्हरहेड वीज पुरवठा बंद झाला व परिणामी वासिंदहून कसाऱ्याकडे जाणारी व कसाऱ्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद झाल्याची अनाउन्समेंट रेल्वेकडून करण्यात येत होती.
दरम्यान, यामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गिकेवर मेल एक्सप्रेस, लोकल गाड्या अडकून पडल्या आहेत.