पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्यास जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Published: April 13, 2023 07:10 PM2023-04-13T19:10:20+5:302023-04-13T19:10:36+5:30
बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करणारे विशाल साठे (५५, रा. अंबरनाथ) २७ मे २०२० रोजी संध्याकाळी त्यांच्या फॉरेस्टनाका येथील कार्यालयात काम करत बसले होते.
कल्याण - भांडणात मध्यस्थी न केल्याच्या रागातून अंगावर पेट्रोल टाकून एकाला जिवंत जाळणाऱ्या रमेश उर्फ मिलन रामखीलावन कोरी (४२, रा. अंबरनाथ) याला कल्याण जिल्हा व अति. सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करणारे विशाल साठे (५५, रा. अंबरनाथ) २७ मे २०२० रोजी संध्याकाळी त्यांच्या फॉरेस्टनाका येथील कार्यालयात काम करत बसले होते. त्यावेळी त्यांचेकडे डम्पर चालक म्हणुन काम करणारा रमेश आला. रमेशचे दोन ते तीन दिवसांपूर्वी साठे यांच्याकडील एक चालक रेड्डी याचे सोबत भांडण झाले होते. त्यावेळी ते भांडण सोडवण्यासाठी साठे यांनी मध्यस्थी करावी अशी रमेशची अपेक्षा होती. मात्र, साठे त्यांच्या भांडणात पडले नाही. याचा राग मनात धरून त्यादिवशी हातात पेट्रोलची बाटली घेऊन रमेश कार्यालयात आला व बाटलीतले पेट्रोल साठे यांच्या अंगावर ओतुन त्यांना पेटवुन दिले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साठे यांचा ३० मे रोजी मृत्यु झाला. मृत्यूपूर्वी साठे यांनी रमेश विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात जबाब दिला होता. त्याआधारे अंबरनाथ पोलिसांनी रमेशला अटक केली.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते व पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक टी. के. सावंत यांनी सबळ पुरावा गोळा करून कल्याण न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पोलिस हवालदार भालचंद्र पवार यांनी मदत केली.