प्रियकराची हत्या करणाऱ्या बापलेकास जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Published: March 2, 2023 08:25 PM2023-03-02T20:25:46+5:302023-03-02T20:25:53+5:30
प्रेमसंबंधाला आशाचा भाऊ चिंतामण आणि वडील देऊ यांचा विरोध होता.
कल्याण : प्रेमसंबंधाला विरोध करत प्रियकराची हत्या करणाऱ्या चिंतामण देऊ खडके व देऊ सोमा खडके (रा. डोळखांब, ता. शहापूर) या बापलेकाला कल्याण जिल्हा व अति सत्र न्यायालयाचे न्या. आर. पी. पांडे यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे राहणाऱ्या निलेश हंबीर (२१) याचे याच गावात राहणाऱ्या आशा खडकेसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाला आशाचा भाऊ चिंतामण आणि वडील देऊ यांचा विरोध होता. ३ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी ३ च्या सुमारास निलेश, आशा तसेच अन्य एकजण दुचाकीवरून घराच्या दिशेने परतत होते. यावेळी, तिथे आलेल्या चिंतामण व देऊ या बापलेकाने निलेशला शिवीगाळ केली. तसेच, सोबत आणलेल्या लाकडी दांडका व लोखंडी सळईने मारहाण केली. ज्यात निलेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी किन्हवली पोलिसांनी बापलेकाला अटक केली.
या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. या प्रकरणात सरकारी वकील योगेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी सहा पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे व कोर्ट ड्यूटी महिला पोलीस कामिनी पाटील यांनी त्यांना मदत केली.