हत्या करणाऱ्यास जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Published: March 8, 2023 07:18 PM2023-03-08T19:18:04+5:302023-03-08T19:18:12+5:30
या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस निरीक्षक एम. बी. सकळे यांनी सबळ पुरावा गोळा करून कल्याण न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.
कल्याण: दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणातून एकाची हत्या तर दुसऱ्याला जखमी करणाऱ्या अनु उर्फ आनंद राठोड (रा. बार्शी टाकळी, जि. अकोला) याला कल्याण जिल्हा व अति. सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी बुधवारी जन्मठेप सुनावली.
शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे बिगारी काम करणारे उदल बिलाराम राठोड (२२), मंगेश नाजुक डोंगरे व अनु बरमदास राठोड असे तिघे थर्टीफस्टची पार्टी करणेकरीता ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री वालशेत येथे दारु पिण्याकरीता एकत्र गेले. रस्त्यात त्या तिघांत आपसात कोणत्यातरी कारणावरुन भांडण होवुन अनु याने कोणत्यातरी कठीण तिक्ष्ण हत्याराने उदल व मंगेश यांचेवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर दुखापत झालेल्या मंगेशचा मृत्यू झाला. तर, उदल गंभीर जखमी झाला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अनुविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस निरीक्षक एम. बी. सकळे यांनी सबळ पुरावा गोळा करून कल्याण न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. त्यांना मुख्य पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे आणि कोर्ट ड्युटी पोलीस शिपाई विलास शिंपी यांनी मदत केली.