मेहुण्याची हत्या करणाऱ्यास जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Published: October 11, 2023 04:49 PM2023-10-11T16:49:24+5:302023-10-11T16:49:56+5:30
शहापूर जिल्ह्यातील टहारपूर येथे राहणाऱ्या भारती निपुर्ते हिच्यासोबत प्रमोदचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रमोद मारहाण करून त्रास देत असल्याने भारती माहेरी निघून आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून मेहुण्यावर चाकू हल्ला करत त्याला जीवे ठार मारणाऱ्या प्रमोद पांडुरंग किसले (रा. शेडगाव, ता. भिवंडी) याला कल्याण अतिरिक्त व सत्र न्यायालयाचे न्या. आर. जी. वाघमारे यांनी जन्मठेप सुनावली. तसेच, आरोपी प्रमोदने शासनाला १५ हजार रुपये भरणा करण्याबरोबरच मयताच्या आईला ५० हजार रूपये भरपाई देण्याची शिक्षाही ठोठावली.
शहापूर जिल्ह्यातील टहारपूर येथे राहणाऱ्या भारती निपुर्ते हिच्यासोबत प्रमोदचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रमोद मारहाण करून त्रास देत असल्याने भारती माहेरी निघून आली होती. प्रमोदने भारतीला परत पाठविण्यासाठी सासरी फोन केला. मात्र, भारतीचा भाऊ पद्माकर तिला सासरी पाठवत नसल्याचा राग प्रमोदला होता. याच रागातून एप्रिल २०१३ मध्ये पद्माकर याच्यावर चाकू हल्ला करून प्रमोदने त्याला जीवे ठार मारले. पद्माकरला सोडविण्यास गेलेल्या महेश जाधव याच्यावर चाकू हल्ला करून प्रमोदने त्याला जखमी केले.
याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात प्रमोदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप साळुंखे यांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रचना भोईर यांनी काम पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे व कोर्ट ड्युटी पोलीस शिपाई विलास शिंपी यांनी मदत केली.