Lift accident: मुलाला अॅडमिट करण्यासाठी जात होते; डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात लिफ़्टचा अपघात, दाम्पत्याच्या पायाला गंभीर दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 02:50 AM2021-04-24T02:50:32+5:302021-04-24T02:55:04+5:30
Lift collapse in Dombivali Private hospital: डोंबिवली पूर्वेकडील एका खाजगी रुग्णालयात शुक्रवारी संध्याकाळी उशिरा हा अपघात झाला.
- मयुरी चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोना संकटाच्या काळात राज्यात विविध रुग्णालयांत दुर्घटना घडत आहेत. भंडारा, नाशिक, भांडुप, विरारनंतर आता डोंबिवलीमधील एका खाजगी रुग्णालयात लिफ़्टचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघात झाल्याचे संबंधित रुग्णालय प्रशासनाने देखील मान्य केले असून यावर अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र या दुर्घटनेत जखमी झालेल्या महाजन कुटुंबियांनी आम्ही या दुर्घटनेतून थोडक्यात वाचलो, अशी प्रतिक्रिया "लोकमतशी" बोलताना दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट सोबतच आता लिफ़्ट ऑडिट करण्याची देखील गरज निर्माण झाली आहे. (Lift mishap in Dombivali Private hospital, couple seriously injuered.)
डोंबिवली पूर्वेकडील एका खाजगी रुग्णालयात शुक्रवारी संध्याकाळी उशिरा हा अपघात झाला. जखमींनी दिलेल्या माहितीनुसार या लिफ्टमध्ये साधारण 4 व्यक्ती होत्या. यापैकी डोंबिवली मधील गांधीनगर परिसरात राहणारे दिलीप महाजन आणि आशा महाजन हे देखील जखमी झाले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पूर्वेकडील शिवम रुग्णालयात या महाजन दाम्पत्यावर उपचार सुरु असून त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाजन कुटुंबीय दुर्घटना झालेल्या रुग्णालयात आपल्या मुलाला अॅडमिट करण्यासाठी गेले होते. यावेळी पहिल्या मजल्यावरुन
दुसऱ्या मजल्यावर जाताना रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याने लिफ़्ट मधील बटन दाबले आणि लिफ़्ट मध्येच अडकली आणि एकदम खाली कोसळली असे जखमींचे म्हणणे आहे. सुदैवाने यामध्ये महाजन यांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेच्या माहितीबद्द्ल लोकमतने मानपाडा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेबद्दल आपल्याला काही माहीत नसून कदाचित दुसऱ्या पोलीस स्थानकात याची नोंद झाली असावी असे उत्तर दिले.
दुर्घटनेवर बोलण्यास रुग्णालयाचा नकार
दुर्घटनेच्या व्याप्तीबद्दल संबंधित रुग्णालयाने बोलण्यास नकार दिला असला तरी शिवम रुग्णालयाच्या नोंद वहीमध्ये जखमींची नावे असल्याचे स्पष्ट झाले असून तसा पुरावा "लोकमतकडे" प्राप्त झाला आहे. कॅमेरासमोर जखमींनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामुळे या घटनेची दखल संबंधित यंत्रणा घेतात का? की आळीमिळी गुपचिळीचे धोरण अवलंबतात ते पाहावे लागेल.
मुलाला ऍडमिट करण्यासाठी आम्ही रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी रुग्णालयाच्या कर्मचा-याकडून कोणतंतरी बटन दाबलं गेलं. लिफ़्ट मध्येच अडकली आणि अचानक खाली कोसळली. 15 ते 20 मिनिट आम्ही लिफ़्ट मध्येच होतो.
- आशा महाजन, जखमी.