रविवारी डोंबिवलीत तिरुपती बालाजीचे होणार थेट दर्शन!

By अनिकेत घमंडी | Published: February 20, 2024 06:56 PM2024-02-20T18:56:27+5:302024-02-20T18:56:41+5:30

तिरुमाला तिरुपती देवस्थान, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा उपक्रम

Live darshan of Tirupati Balaji in Dombivli on Sunday! | रविवारी डोंबिवलीत तिरुपती बालाजीचे होणार थेट दर्शन!

रविवारी डोंबिवलीत तिरुपती बालाजीचे होणार थेट दर्शन!

डोंबिवली: तिरुमाला तिरुपती देवस्थान आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीच्या प्रीमियर कंपनी मैदानात तिरुमाला तिरुपती बालाजी देवस्थान येथील मंदिरातील बालाजी देवाची प्रत्यक्ष मूर्ती भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध होणार असून श्री क्षेत्र तिरुपती येथे होणाऱ्या सर्व पूजा अर्चा भक्तांना करता येतील. रविवारी पहाटे साडेसहा वाजल्यापासून ते रात्री अकरा हा सोहळा संपन्न होणार आहे.

सकाळी ६.३० वाजल्यापासून सुप्रभातमने श्री बालाजी देवाला उठविण्यात येईल त्यानंतर तोमाला सेवा म्हणजेच बालाजीच्या देखण्या मूर्तीला हार अर्पण करण्यात येतील नंतर १००८ जोडपी बालाजी ची कुंकूमार्चन अशी पूजाअर्चने मधे सहभाग घेतील, आणि त्यानंतर अभिषेकाने या पूजेची दुपारी साधारण साडेअकरा बाराला सांगता होईल, या सर्व बालाजी भगवान च्या पूजाअर्चा करण्यासाठी तिरुपती बालाजी मंदिरातीलच पुजारी स्वतः आलेले आहेत. तसेच त्याचा प्रसाद बनविण्याची जबाबदारी देखील तिरुपती बालाजी मंदिरातून आलेले आचारी हेच करणार आहेत. 

दुपारी बरोबर ३ वाजता डोंबिवलीच्या सागर्ली येथील बालाजी मंदिरापासून ते कार्यक्रम स्थळी म्हणजेच प्रीमियर मैदानापर्यंत हजारो भक्तांच्या सहवासात भव्य अशी श्री बालाजी देवाची पारंपारिक रथयात्रा काढण्यात येणार आहे, या भव्य अशा रथयात्रेत दक्षिण भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा धार्मिक मेळ दिसून येणार आहे, आणि त्यानंतर प्रीमियर मैदानात बालाजीचा भव्य असा लग्न सोहळा सायंकाळी पार पडण्यात येणार असून त्यानंतर लाखो भावीक तेथे प्रसादाचा लाभ घेणार आहेत.

श्री क्षेत्र तिरुपती बालाजी देवस्थान कडून तेथील प्रसिद्ध प्रसादाचे दोन लाख लाडू देखील येथे पाठविण्यात येणार आहे. या संपूर्ण पूजा अर्चा व कार्यक्रमाची जबाबदारी ही वारकरी संप्रदाय ठाणे रायगड जिल्हा आणि श्री बालाजी मंदिर सागर्ली, डोंबिवली यांच्याकडे देण्यात आलेले असून डोंबिवली व कल्याण लोकसभा क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळ, विविध धार्मिक व सामाजिक संस्था या सर्वांनी स्वतःहून या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी घेतलेली आहे असे शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश।कदम यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे स्थळापासून प्रीमियर मैदान कल्याण शीळ रोड ते डोंबिवली सागर्ली येथील श्री बालाजी मंदिराच्या प्रवेश द्वारापर्यंत संपूर्ण आकर्षक व आगळी वेगळी अशी विद्युत रोषणाई पाहायला मिळणार आहे, मिरवणुकीच्या वेळेला दक्षिण भारतीय परंपरा असलेले वाद्य, नृत्य, मोठमोठ्या आकारातील व रूपातील विविध वेशभूषेतील धार्मिक कलाकृती सहभागी झालेल्या पहायला देखील मिळणार आहेत दक्षिण भारताच्या परंपरेनुसार फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट कार्यक्रम स्थळी बघायला मिळेल ज्या ज्या पुजा अर्चना श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी मंदिरात होतात त्या सर्व पूजा अर्चा करण्याचा मान सर्व भाविकांना मिळणार असल्यामुळे पूर्ण वातावरण भक्तीमय होणार आहे. 

ज्या भाविकांना या अनोख्या अशा श्री बालाजी दर्शनात यायचे असेल त्यांनी ७८७५५६७६५७ या मोबाईल नंबर वर मिस कॉल द्यायचा आहे जेणेकरून त्यांची नोंद केली जाईल तसेच रविवारी पहाटे होणाऱ्या कुंमकुंमअर्चना या पूजेमध्ये जी १००८ जोडपी सहभागी होणार, जर भाविकांना या कुमकुम अर्चना पुजेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी लवकरात लवकर नोंद करायची आहे असे आवाहन शिंदेंच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Live darshan of Tirupati Balaji in Dombivli on Sunday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.