दुकानदारांनी निर्बंधांनाच धातले ‘कुलूप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:49 PM2021-03-11T23:49:17+5:302021-03-11T23:49:36+5:30
कल्याण, डोंबिवलीत सायंकाळी ७ नंतरही काही दुकाने उघडी : पोलिसांना पाहताच उडाली तारांबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्तांनी गुरुवारपासून जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने सायंकाळी ७ नंतर बंद करण्याचा आदेश दिला असतानाही कल्याण व डोंबिवलीत अनेक दुकाने ७ नंतरही उघडी होती. पोलिसांची गाडी येताना पाहून अनेक दुकानदार दुकानांचे शटर खाली ओढत होते. मात्र पोलीस दिसेनासे होताच पुन्हा दुकाने उघडत होते. त्याचवेळी सरबत, वडापाव, भेळपुरी, चायनीजच्या गाड्यांनी निर्बंध पाळल्याचे दिसत होते.
मनपा हद्दीतील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. गुरुवारी या निर्बंधांचा पहिला दिवस होता. सायंकाळी पोलिसांची गाडी दुकाने बंद करण्याकरिता फिरू लागल्यावर दुकानदारांची एकच धावपळ उडाली. अनेक दुकाने सात वाजून गेले तरी उघडीच होती. पोलिसांनी गाडी थांवबून दुकाने उघडी असलेल्या दुकानदारांना तंबी दिली. कोरोनाचे नियम पाळा, आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नका, असे आवाहन पोलिसांनी दुकानदारांना केले. मात्र काही मोजक्या दुकानदारांनी सातच्या आतच शटर डाऊन केले होते.
खाद्यपदार्थ, शीतपेयाच्या हातगाड्यांनाही सातपर्यंत व्यवसायाची मुभा असल्याने या गाड्या बंद झाल्या. मात्र दुकानदारांनी लॉकडाऊनचे निर्बंध फारसे मनावर घेतलेले नाहीत.
कोरोनाचे २६४ रुग्ण
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात गुरुवारी कोरोनाच्या २६४ रुग्णांची भर पडली. मागील २४ तासांत १६८ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांमुळे महापालिका परिसरातील एकूण रुग्णसंख्या ६५ हजार ७२९ वर पोहोचली आहे. तर, त्यापैकी ६२ हजार ०६४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या दोन हजार ४५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
डोंबिवली स्थानक परिसरात संमिश्र प्रतिसाद; हातगाड्या सुरूच
डोंबिवली : शहरातील बहुतांश भागात गुरुवारी निर्बंधाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असला, तरी मुख्य चौकांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. रेल्वेस्थानक परिसरात मात्र काही दुकाने बंद असल्याचे दिसून आले.
पोळी-भाजी केंद्रे, खाद्यगृह, बार-रेस्टॉरंट, परमिट रूम, आइस्क्रीम पार्लर, ज्युस सेंटर यांना ११ वाजेपर्यंतची मुभा दिली आहे. परंतु, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात काही खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सातनंतर सुरू होत्या. शिववडापावच्या गाड्या राजरोस सुरू होत्या. स्थानक परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद होती. परंतु, मानपाडा रोडवर कपडे, बूट-चप्पल, ज्वेलर्स ही दुकानेही रात्री सुरूच होती. पाथर्ली परिसरात मटणविक्रीची दुकाने शटर अर्ध्यावर ठेवून बिनदिक्कत सुरू होती.
खाऊगल्ली असलेल्या पेंढरकर महाविद्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या मात्र संध्याकाळी बंद होत्या. रिक्षात दोन प्रवाशांना परवानगी असताना रिक्षाचालकांकडूनही जादा प्रवासी भरून वाहतूक सुरू असल्याचे व नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले.
तर, शेलारनाका परिसरात नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित जमा झाले होते. त्यामुळे निर्बंध घालण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे दिसून आले.