कल्याण लोकसभा मतदारसंघात शुक्रवारपासून गृह मतदानाला प्रारंभ; ३२ पथके तैनात
By अनिकेत घमंडी | Published: May 9, 2024 04:51 PM2024-05-09T16:51:46+5:302024-05-09T16:53:04+5:30
३२ सूक्ष्म निरीक्षक यांची देखील नेमणूक.
अनिकेत घमंडी, डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत गृह मतदानाला शुक्रवार पासून सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ८५ वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या तसेच दिव्यांग, मतदारांना त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या घरी टपाली मतदान, गृह मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार अशा मतदारांना टपाली मतदानाचे नमुना १२ ड मधील अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्यापैकी प्राप्त झालेल्या अर्जांवर निर्णय घेण्यात आलेला असून मंजूर अर्जांच्या यादीनुसार खालील विधानसभा निहाय मतदार संघाद्वारे ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेण्यात येणार आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात ६३ मतदार, व २१ दिव्यांग मतदार, उल्हासनगर विधानसभा मतदार संघात ३४ मतदार, व ८ दिव्यांग मतदार, कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात ३० मतदार, व ४ दिव्यांग मतदार, डोंबिवली विधानसभा मतदार संघात ७९ मतदार व ४ दिव्यांग मतदार, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात २८ मतदार व ५ दिव्यांग मतदार, कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघात वर्षे पेक्षा जास्त असलेले १६ मतदार व ५ दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहेत. याकरिता मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या देखील नेमणुका करण्यात आल्या आहेत, उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मतदानाच्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात याबाबत सर्व उमेदवार यांना उपस्थित राहण्याबाबत पत्र देखील देण्यात आली आहेत.
गृह भेटीसाठी अंबरनाथ विधानसभा मतदार संघात १०, उल्हासनगर विधानसभा मतदार संघात ४ पथके, कल्याण ( पूर्व विधानसभा मतदार संघात ३ पथके, डोंबिवली विधानसभा मतदार संघात १० पथके, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात ३ पथके व कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघात २ पथके अशी एकूण ३२ पथके तयार करण्यात आली आहेत. या कामाकरीता केंद्रीय निवडणूक आयोगाने ३२ सूक्ष्म निरीक्षक यांची देखील नेमणूक केली आहे. या सर्व प्रक्रियेचे विडिओ चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. गृह मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार असून, गृह मतदानाकरीता येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे.