केडीएमसी हद्दीतील रस्ते प्रकल्प बाधितांच्या सदनिका वाटपाची सोडत गुरुवारी
By मुरलीधर भवार | Published: February 7, 2024 05:46 PM2024-02-07T17:46:34+5:302024-02-07T17:47:10+5:30
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्ते प्रकल्प बाधितांना बीएसयूपी योजनेत घरे देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
मुरलीधर भवार, कल्याण:कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्ते प्रकल्प बाधितांना बीएसयूपी योजनेत घरे देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या सदनिका वाटपाची सोडत येत्या गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी अत्रे रंगमंदिरात होणार आहे. घरांसाठी ६६२ प्रस्ताव महापालिकेच्या मालमत्ता आणि पुनर्वसन समितीकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ४९१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. ४८ प्रस्ताव अपात्र ठरले आहेत.
महापालिका हद्दीत यूपीए सरकारच्या काळात केंद्र सरकारची शहरी गरीबांकरीता घरे अशी बीएसयूपी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेत ७ हजार घरे उभारली जाणार आहे. त्यापैकी ४ हजार घरे बांधून तयार आहेत. बीएसयूपी योजनेतील लाभार्थींना घरे वाटून जी घरे उरणार आहेत. त्या घरांमध्ये महापालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्याचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या पूर्वी हा प्रकल्प केंद्राचा असल्याने त्यासाठी केंद्राची मंजूरी घ्यावी लागली. तसेच घरांच्या वाटपासंदर्भातील राज्य सरकारचा अध्यादेश काढण्यात आला रस्ते बाधितांकडून कागदपत्रे मागविण्यात आली होती. त्यांच्या हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यात आली. प्राप्त प्रस्ताव पुनर्वसन समितीकडे सादर केले गेले. समितीने तूर्तास ४९१ प्रस्ताव मंजूर केले आहे. उर्वरीत प्रस्तावही लवकर मंजूर केले जातील. या प्रकल्पा बाधितांच्या घरे वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केला जाणार आहे.
यापूर्वी महापालिकेने बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांच्या घराच्या वाटपाची सोडत काढली होती. ही प्रक्रिया राबवित असताना अपात्र लाभार्थ्यांना घरे देण्याचा मुद्दा उपस्थित करीत वास्तूविशारद संदीप पाटील यांनी हरकत घेतली होती. या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे लाभार्थींच्या घरे वाटपावर न्यायालयाची स्थगिती होती. त्यानंतरच्या न्यायालयीन सुनावणीत ९४ अपात्र लाभार्थींच्या घर वाटपाचा प्रश्न वगळून अन्य पात्र लाभार्थींना घरे वाटप करण्यावरील स्थगिती न्यायालयाने मागे घेतली होती.