अंबरनाथमध्ये प्रेमविवाहातून तरुणाची हत्या, बायकोसमोरच भरदिवसा दगडाने ठेचले; दोन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 06:06 AM2021-05-14T06:06:06+5:302021-05-14T06:10:19+5:30
तरुणाला मारहाण होत असताना त्याची पत्नी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती मात्र आरोपीने त्याच्या पत्नीला बाजूला सारत या तरुणाची हत्या केली.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये प्रेमविवाह केल्याच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्वेला घडलेला हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भरदिवसा हा प्रकार घडला असून कोणीही त्या तरुणाला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. शिवाजीनगर पोलिसांनी काही मिनिटात घटनास्थळी धाव घेत पळून जात असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.
विजय नवलगिरे (३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो रिक्षाचालक होता. विजय याने ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेतील एका मुलीशी प्रेमविवाह केला? होता. अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये तो पत्नीसह राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातील काही तरुण विजयला आमच्या भागातील मुलीशी प्रेमविवाह का केला? असे म्हणत काही दिवसापासून त्रास देत होते. त्यातूनच गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विजयच्या घरी ५ ते ७ तरुण आले आणि त्यांनी विजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला घराबाहेर आणत त्याच्या डोक्यात फरशी घातली. त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड घालत त्याची हत्या करण्यात आली.
तरुणाला मारहाण होत असताना त्याची पत्नी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती मात्र आरोपीने त्याच्या पत्नीला बाजूला सारत या तरुणाची हत्या केली. मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरु असताना एका अनोळखी व्यक्तीने हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला.