डोंबिवलीत शिवसेना-मनसेच्यावतीने महाआरती; ना. रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती
By अनिकेत घमंडी | Published: January 22, 2024 05:54 PM2024-01-22T17:54:33+5:302024-01-22T17:55:12+5:30
मंत्री रवींद्र चव्हाण यांची सर्वपक्षीय कार्यक्रमांना उपस्थिती, जय श्रीराम घोषणा देऊन।संवाद
डोंबिवली: श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवली स्टेशन परिसरातील श्री राम मारुती मंदिर येथे शिवसेना शिंदे गट व मनसे यांच्या वतीने महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. जय श्री रामचा नारा देत दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंदिरात आरती केली.
आयोध्या येथील श्री राम मंदिरात प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची पारणप्रतिष्ठापणा सोमवारी होत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली व कल्याण ग्रामीण भागात रविवारपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सर्व पक्षाचे पदाधिकारी शहरातील विविध मंदिरात जाऊन देवदर्शन करत आरती करत आहेत. डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरातील श्री हनुमान मंदिरात सकाळ पासून होमहवन, पूजेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे दुपारी 12 च्या सुमारास महाआरती करत जय श्री राम अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मंदिरात महाआरती केली.
शहरात ठीकठिकाणी मंदिरात पूजाअर्चा केल्या जात असून वातावरण भक्तिमय झाले. भाजपच्या वतीने कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यानी इंदिरा गांधी चौकात लाडु वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. येथील स्वामी नारायण मंदिरातर्फे सुद्धा मंदिर ते जिमखाना मिरवणूक काढण्यात आली होती. फडके पथ येथे श्री गणेश मंदिरतर्फे सामूहिक महाआरती व अयोध्या सोहळा बघण्याचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता. त्या सर्व ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व पक्षीय कार्यक्रमाना उपस्थित राहून सगळ्यांशी संवाद साधला.