भाजप पदाधिकारी संदीप माळी यांच्यावर तडीपारीची कारवाई; मनसेचा प्रचार केल्यावरून कारवाईचा आरोप

By प्रशांत माने | Published: November 14, 2024 10:20 PM2024-11-14T22:20:37+5:302024-11-14T22:23:14+5:30

संदीप माळी हे मंत्री रविंद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 Action against BJP office bearer Sandeep Mali | भाजप पदाधिकारी संदीप माळी यांच्यावर तडीपारीची कारवाई; मनसेचा प्रचार केल्यावरून कारवाईचा आरोप

भाजप पदाधिकारी संदीप माळी यांच्यावर तडीपारीची कारवाई; मनसेचा प्रचार केल्यावरून कारवाईचा आरोप

डोंबिवली: कल्याण ग्रामीणमधील भाजपचे पदाधिकारी संदीप माळी यांना १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी जाहीर सभा झाली. त्यानंतर रातोरात भाजपचा पदाधिकारी असलेल्या माळी यांच्यावर झालेली कारवाई चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान मी महायुती धर्म पाळत होतो. पण मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना प्रचारात मदत करीत असल्याच्या संशयावरून मला तडीपारीच्या कारवाईचे फळ मिळाले अशी संतप्त प्रतिक्रिया माळी यांनी माध्यमांना दिली.

माळी हे मंत्री रविंद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत. माळी यांच्यावर दाखल असलेल्या गुन्हयांप्रकरणी पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली असली तरी कल्याण ग्रामीणमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर बुधवारी मध्यरात्री भाजपच्या पदाधिकारी असलेल्या माळी यांना तडीपारीची बजावलेली नोटीस आणि झालेली कारवाई राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दरम्यान तडीपारीची कारवाई झालेल्या माळी यांच्या वक्तव्याने या आरोपाला पुष्टी मिळत आहे. 

"मी रविंद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता आहे. असल्या फालतू कारवाईला घाबरणारा नाही. लोकसभेत आम्ही युतीधर्म पाळला. मी कोणालाही त्रास अथवा धमकी दिलेली नाही. पण मनसेचे राजू पाटील हे माझे मित्र आणि नातेवाईक असल्याने मला किती त्रास झाला आहे ते बघा. ग्रामीणमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो महायुती धर्म पाळल्याचे मला फळ मिळाले तुम्ही सावध रहा. मी पाटील यांचा प्रचार करतो असा संशय घेऊन समोरच्यांनी माझ्यावर कारवाई केली त्यांना धन्यवाद," अशी संतप्त  प्रतिक्रिया माळी यांनी दिली.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Action against BJP office bearer Sandeep Mali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.