संघाचा ‘किल्ला’ भाजप राखणार? मनसेकडून उमेदवार नाही, उद्धवसेनेने खेळले ‘आगरी कार्ड’

By अनिकेत घमंडी | Published: November 4, 2024 10:58 AM2024-11-04T10:58:45+5:302024-11-04T11:02:41+5:30

Maharashtra Assembly Election 2024: रा. स्व. संघाचा डोंबिवली हा बालेकिल्ला असून, या ठिकाणी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत एकेकाळी जनसंघ आणि आता भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकून येत असल्याचा इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपतर्फे चौथ्यांदा रिंगणात आहेत.

Maharashtra Assembly Election 2024: BJP will maintain the 'fortress' of the RSS? No candidate from MNS, Uddhav Sena played 'Agri card' | संघाचा ‘किल्ला’ भाजप राखणार? मनसेकडून उमेदवार नाही, उद्धवसेनेने खेळले ‘आगरी कार्ड’

संघाचा ‘किल्ला’ भाजप राखणार? मनसेकडून उमेदवार नाही, उद्धवसेनेने खेळले ‘आगरी कार्ड’

- अनिकेत घमंडी 
डोंबिवली - रा. स्व. संघाचा डोंबिवली हा बालेकिल्ला असून, या ठिकाणी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत एकेकाळी जनसंघ आणि आता भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकून येत असल्याचा इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपतर्फे चौथ्यांदा रिंगणात आहेत. याही वेळेस ते संघाचा बालेकिल्ला राखणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्या विरोधात उद्धवसेनेने आगरी कार्ड वापरत दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. मनसेने चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार न देता भाजपला सहकार्य केले.

चव्हाण यांनी २०१४ मध्ये दीपेश म्हात्रे यांचा पराभव केला होता. २००९, २०१४, २०१९ पासून प्रत्येक वेळी चव्हाण यांचे मताधिक्य वाढत आहे. यावेळी ते सार्वजनिक बांधकाममंत्री असल्याने त्यांना किती मते पडतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. २००९ मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार स्व. हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून चव्हाण यांनी उमेदवारी मिळविली होती. त्यानंतर २०१४, २०१९ ला त्यांनी पक्षात वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना दोन गटांत विभागली गेली तेव्हा दीपेश शिंदेसेनेत गेले होते. मात्र, यंदा डोंबिवली मतदारसंघ महायुतीतील वाटपानुसार भाजपकडेच राहिल्याने म्हात्रे यांनी शिंदेसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत पुन्हा उद्धवसेनेची वाट धरत उमेदवारी मिळवली. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. 

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?
 लोकसभेला शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशीच लढत झाली होती. शिंदेसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, तर उद्धवसेनेकडून वैशाली दरेकर-राणे रिंगणात होते. शिंदे यांना डोंबिवलीमध्ये ९९ हजार ७०० मते मिळाली. शिंदे यांच्या विजयात डोंबिवलीच्या मतांचा मोठा वाटा आहे.
 २०२४ मध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना पाच लाख ८९ हजार ६३६ मते, तर वैशाली दरेकर-राणे यांना तीन लाख ८० हजार ४९२ मते मिळाली होती. 

कळीचे मुद्दे
भाजपचा हा बालेकिल्ला आहे. चव्हाण यांना डोंबिवलीमधून नेहमीसारखी आघाडी मिळवावी लागणार आहे. उद्धवसेनेची आगरी कार्ड खेळण्याची रणनीती यशस्वी होणार का, याची चर्चा सुरू आहे.
या भागात अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, फेरीवाले, अनधिकृत बांधकामे या समस्या आहेत. क्लस्टर योजनेची अंमलबजावणी, नवा डीपी मंजूर करणे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: BJP will maintain the 'fortress' of the RSS? No candidate from MNS, Uddhav Sena played 'Agri card'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.