उल्हासनगर प्रचारात विकास कामाचा विसर
By सदानंद नाईक | Published: November 18, 2024 09:35 PM2024-11-18T21:35:23+5:302024-11-18T21:35:23+5:30
अपक्ष व बंडखोर उमेदवार गंगोत्री यांनी मात्र चेहरा बदलो, शहर बदलो असा नारा देऊन विकास कामाच्या दुरावस्थेचे चित्र मांडले होते.
सदानंद नाईक, उल्हासनगर : प्रचाराच्या तोफा थंडाविल्या असून प्रचारात बहुतांश उमेदवारांना शहर विकास कामाचा विसर पडल्याचे चित्र होते. अपक्ष व बंडखोर उमेदवार गंगोत्री यांनी मात्र चेहरा बदलो, शहर बदलो असा नारा देऊन विकास कामाच्या दुरावस्थेचे चित्र मांडले होते.
उल्हासनगरात ४२६ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजना सुरु असून गटारीचे पाईप टाकण्यासाठी संपूर्ण शहराचे रस्ते खोदण्यात आले. मात्र खोदलेले रस्ते दुरुस्त केले नसल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली. तसेच एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरु आहेत. याशिवाय मूलभूत सुखसुविधेच्या अंतर्गत कोट्यावधीचे कामे सुरु असून इतर विकास निधीतूनही विकास कामे सुरु आहे. एकूणच विकास कामाच्या नावाखाली शहराचा चेहरामोहरा बदलण्या ऐवजी शहरांची दुरावस्था झाली. याशिवाय पाणी टंचाई, साफसफाई, आरोग्य व्यवस्था, अवैध बांधकाम, धोकादायक इमारती, डम्पिंग आदीची समस्या उभी ठाकली आहे.
महाविकास आघाडीचे ओमी कलानी, महायुतीचे कुमार आयलानी यांच्यासह अन्य उमेदवारांनी शहर विकासाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे संपूर्ण प्रचारा दरम्यान उघड झाले. अजित पवार गटाचे बंडखोर व अपक्ष उमेदवार भारत गंगोत्री यांनी शहर विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला. मात्र त्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याचा एकूण चित्र होते. शहर विकास मुद्द्या एवजी इतर राज्यस्तरीय मुद्द्याचा प्रचार शहरांत उमेदवारांकडून झाला आहे.