Maharashtra Lockdown : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार, अतिरिक्त आयुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 08:46 PM2021-04-05T20:46:57+5:302021-04-05T20:47:37+5:30
Maharashtra Lockdown : ३० एप्रिलपर्यंत रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत नाइट कर्फ्यू राहणार आहे.
कल्याण : राज्य सरकारने कोरोना रोखण्यासाठी नव्याने काढलेल्या आदेसानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती कल्याणडोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.
३० एप्रिलपर्यंत रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत नाइट कर्फ्यू राहणार आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ वाजताच्या दरम्यान पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्रित फिरता येणार नाही. तसेच शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. सरकारी आणि खाजगी वाहतूक सेवा सुरु राहणार आहे. परिवहन सेवा सुरु राहणार आहेत.
रिक्षातून केवळ दोन प्रवासी प्रवास करु शकतात. ५० टक्के पेक्षा जास्त क्षमतेने सरकारी आस्थापनांमधील कामकाज करता येणार नाही. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या ठिकाणी काम करणाऱ्यांनी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यायची आहे. त्याचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखविल्याशिवाय त्यांना दुकानात सेवा देता येणार नाही.
'ब्रेक द चेन' या अंतर्गत सरकारने आजपासून लागू केलेल्या निर्बंधानुसार आज कल्याण स्टेशन परिसरात पोलिसांनी फिरून रिक्षा चालकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. प्रत्येक रिक्षा चालकाने १० एप्रिलच्या आत आरटीपीसीआर टेस्ट करुन त्याचा रिपोर्ट सोबत ठेवायचा आहे. हा रिपोर्ट रिक्षा चालकाकडे असल्याची खात्री करुनच प्रवाशांनी त्या रिक्षातून प्रवास करायचा आहे असे पोलिसांनी सांगितले.