कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचीच आगेकूच राहील : पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 12:54 AM2021-02-12T00:54:27+5:302021-02-12T00:54:49+5:30
गोळवलीत डॉ. वंडार पाटील यांच्या निवासस्थानी बैठक : नव्या चेहऱ्यांना प्राधान्य
डाेंबिवली : महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची आगेकूच कशी राहील याची मोर्चेबांधणी करण्यासाठी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांची त्यांच्या गोळवली येथील निवासस्थानी रविवारी भेट घेतली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या बैठकीत पक्ष बांधणीसह महाविकास आघाडीच्या समीकरणासंदर्भात सुमारे पाऊण तास चर्चा झाली. येथील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासह शिवसेना महाविकास आघाडीचा धर्म पाळून जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक कसे निवडून येतील, यादृष्टीने त्यांनी विचारमंथन केले. पाटील यांना जवळपास चाळीस वर्षांचा अनुभव असून, त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन पटोले यांनी माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना
केले.
आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद मिळून तीन आकड्यांमध्ये भरघोस यश नक्कीच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने उमेदवार आणि मतदारांचे पॉकेट्स कसे असतील यासंदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे मत वंडार पाटील यांनी व्यक्त केले.
त्यावर पटोले म्हणाले की, राज्यभरातून, प्रसंगी देशभरातून जे काही सहकार्य लागेल, ते निवडणुकीसाठी दिले जाईल. निवडणुकीत यश मिळवून पक्षाला बळकटी देण्यासाठी जे सहकार्य लागेल, त्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त संख्येने येथे नगरसेवक निवडून कसे येतील, हे स्थानिक नेत्यांनी बघावे, असे ते म्हणाले.
युवकांना निवडणुकीत जास्तीत जास्त संधी देण्यात यावी, असे मत सुधीर पाटील यांनी मांडले. त्यावर युवकांना प्राधान्य देऊन नवीन चेहरे आपण राजकारणासमोर आणि नागरिकांसमोर आणून पक्षाला बळकटी मिळेल यासाठी प्रयत्न करू या, असे पटोले म्हणाले. आगामी काळात महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी निवडणुकीदरम्यान महिलांनादेखील संधी देण्याबाबत चर्चा झाली. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पुरेसे सदस्य निवडून आले असून, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक समस्या, विकासाचे मुद्दे आणि विरोधकांची कमजोरी शोधून त्याचा नागरिकांसमोर पर्दाफाश करण्यावर यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली.