वीजतोडणीसाठी गेले, जमावाने दगडाने मारले; खोणी गावातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 08:47 AM2023-05-25T08:47:56+5:302023-05-25T08:48:37+5:30
ग्रामीण भागातील वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनीने कारवाईचा धडका सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : बेकायदा वीजजाेडणीद्वारे वीजचोरी करणाऱ्याविरोधात वीज वितरण कंपनीचे भरारी पथक कारवाईसाठी खोणी गावात गेले होते. या पथकावर जमावाने हल्ला करून करवाईत अडथळा आणून अभियंते, कर्मचारी आणि पोलिसांना लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. तसेच दगडफेक करून गाडीचीही तोडफोड केली. यावेळी जमावाने भरारी पथकाच्या ताब्यातील मीटरही हिसकावला.
ग्रामीण भागातील वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनीने कारवाईचा धडका सुरू केला आहे. बुधवारी खाेणी गावात वीजचाेरीविराेधी पथक कारवाईसाठी गेले हाेते. एका बंगल्यातील वीज मीटरविरोधात कारवाई सुरू असताना अचानक काही जण त्याठिकाणी आले. पथकांशी त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी काही जणांनी लाकडी दांडक्याने भरारी पथकातील अभियंते, कर्मचारी, पोलिस यांच्यावर हल्ला करून दगडफेक केली. यावेळी पोलिस कर्चाऱ्यालाही मारहाण केली. त्यामुळे पथकाने तेथून काढता पाय घेत मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मांगरुळ गावातही झाला हाेता हल्ला
काही महिन्यांपूर्वी मांगरुळ गावात वीजचोरीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या पथकावर असाच जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक करून कारवाई केली होती. आताही भरारी पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे.