महावितरणच्या गलथान कारभाराचा रहिवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:52 AM2021-04-08T00:52:37+5:302021-04-08T00:52:51+5:30
वर्षभरात आगीच्या पाच घटना
डोंबिवली : एमआयडीसीतील निवासी विभागामध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. वर्षभरात त्या परिसरात पाच वेळा ट्रान्सफॉर्मर स्फोट होण्याच्या व तारांना आगी लागल्याचा घटना घडल्या आहेत. परंतु, तरीही जुनाट उपकरणांची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने वाढत्या अपघातांचे महावितरणला गांभीर्य नसल्याची टीका रहिवाशांमधून व्यक्त होत आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यावरील डीपी बॉक्सची झाकणे,दरवाजे गायब झाली असून त्यांच्या केबल जमिनीचा सुरुवातीचा काही भागात वरती, उघड्यावर असल्याने यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वीजवाहिनीचे लोखंडी खांब आणि त्याला लटकवून टाकण्यात येणारी स्टे वायर गंजून गेल्या असून मागील कित्येक वर्षांत त्यांना रंगरंगोटी झाली नाही आहे. खांबांना आधार असणाऱ्या स्टे वायर काही ठिकाणी तुटल्याने ते खांब कधीही धोकादायक बनू शकतात. निवासी भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने या सर्वांची नियमित देखभाल, दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पण विविध कारणे सांगून महावितरण जनतेची दिशाभूल करीत आहे. वीजदेयक काही कारणाने वेळेत भरली गेली नाहीत तर लगेच वीजजोडणी तोडण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तत्परता दाखवत असतात. पण तीच सतर्कता देखभाल, दुरुस्ती कामात का दाखवत नाही, असा सवाल त्यांनी महावितरणला उद्देशून केला. आता मोठ्या दुर्घटनेनंतर महावितरणला जाग येणार का? असेही ते म्हणाले.
याबाबत मिलापनगरच्या रहिवाशांनी वारंवार महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना याची फोटोसह माहिती दिली असूनही ते यावर दुर्लक्ष करीत असल्याचे रहिवासी राजू नलावडे यांचे म्हणणे आहे. येत्या पावसाळ्यात अपघात झाल्यास त्यामुळे या ठिकाणी भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते.