बँकेतील ३४ कोटींवर डल्ला मारणाऱ्या मुख्य आरोपीला तीन महिन्यांनी अटक
By प्रशांत माने | Published: October 7, 2022 06:17 PM2022-10-07T18:17:05+5:302022-10-07T18:17:29+5:30
बँकेतील ३४ कोटींवर डल्ला मारणाऱ्या मुख्य आरोपीला तीन महिन्यांनी अटक करण्यात आली आहे.
डोंबिवली : जुलै महिन्यात येथील निवासी एमआयडीसी भागातील आयसीआयसीआय बँकेच्या तिजोरीतील ३४ कोटी रूपयांवर डल्ला मारणारा मुख्य आरोपी तथा बँकेचा लॉकर असिस्टंट मॅनेजर अल्ताफ शेख याला मानपाडा पोलिसांनी बुधवारी कोल्हापूर येथून अटक केली. या गुन्ह्यात त्याला साथ देणारी त्याची बहीण निलोफर हिला देखील ताब्यात घेतले आहे. त्याच्या तीन साथीदारांना यापुर्वीच ठाणे मालमत्ता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. झटपट पैसा कमावण्यासाठी बँक लुटीच्या घटनांवर आधारीत वेब सिरीज पाहून अल्ताफ ने हा चोरीचा कट रचला होता.
८ ते १३ जुलै दरम्यान हा धाडसी चोरीचा प्रकार बँकेत घडला होता. स्थानिक मानपाडा पोलिसांसह या गुन्ह्याचा तपास ठाणे मालमत्ता गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते. त्यांनी गुन्ह्यातील इसरार कुरेशी, शमशाद खान आणि अनुज गिरी या तिघांना १८ जुलैला मुंब्रा येथील मित्तल मैदानाजवळ सापळ लावून अटक केली होती. परंतु मुख्य सूत्रधार अल्ताफ फरार होता. बँकेच्या तिजोरीतील सुमारे ३४ कोटी रककम लुटण्याचा डाव रचला गेला होता. त्याने ती रोकड एसीच्या छिद्र पाडलेल्या भागातून बँक इमारतीच्या पाठीमागील बाजूला लोटली होती. त्यावर ताडपत्री टाकली होती. मात्र या रकमेतील १२ कोटी २० लाखांची रककम मात्र लुटून नेण्यात चौघांना यश आले होते. तिघांच्या अटकेनंतर मुख्य आरोपी अल्ताफच्या मागावर मानपाडा पोलीस होते. तो आणि त्याची बहिणी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू असल्याची माहीती वरीष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली.
अशी केली चोरी
अल्ताफ हा ११ वर्षे बँकेत कार्यरत होता. त्यामुळे बँकेचे कर्मचारी, अधिकारी, सुरक्षारक्षक यांचे येणोजाणो तसेच सीसीटिव्ही कुठे आहेत याची माहीती होती. बँक तिजोरी लुटण्याचा निर्णय झाल्यावर लुट केलेली रोकड कुठे ठेवायची हे देखील ठरले होते. रोकड ठेवण्यासाठी त्याने तळोजा येथे बहीण निलोफर हिच्या नावाने एक फ्लॅट खरेदी केला होता. बँक लुटीच्या घटनांवर आधारीत असलेली 'मनी हिस्ट' ही वेबसिरीज पाहून त्याने चोरीचा प्लॅन आखला. तिजोरीतील ३४ कोटींची रोकड चोरण्यापूर्वी तिजोरीचा बारकाईचा अभ्यास त्याने केला होता.