कल्याण येथील लोकोशेडमध्ये २११ इंजिनांची देखभाल; ९२ वा स्थापना दिवस शनिवारी साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 11:39 PM2020-11-29T23:39:44+5:302020-11-29T23:39:54+5:30
प्रारंभी ईए-१ आणि ईएफ -१ प्रकारातील डीसी लोकोमोटिव्हज येथे होत्या. या शेडला डब्ल्यूसीएम -२, डब्ल्यूसीएम -३ व डब्ल्यूसीएम ४ श्रेणीची इंजिने प्राप्त झाली.
डाेंबिवली : कल्याण येथील इलेक्ट्रिक लोकोशेडचा ९२ वा स्थापना दिवस शनिवारी साजरा झाला. यावेळी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना कोरोनाकाळात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. दरम्यान, तत्कालीन ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेने उभारलेल्या या पहिल्या इलेक्ट्रिक लोकोशेडमध्ये आतापर्यंत १६ विविध प्रकारच्या लोकोमोटिव्हजची (इंजीन) देखभाल दुरुस्ती झाली आहे. तर, सध्या सात प्रकारच्या इंजिनांची देखभाल होत असून, २११ इंजिने देखभालीसाठी हाताळली जात आहेत.
रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या लोको शेडमध्ये डब्ल्यूसीएएम तीन प्रकारांतील ५३, डब्ल्यूसीएएम दोन प्रकारांतील २०, डब्ल्यूसीएजी एक प्रकारातील १२, डब्ल्यूएजी सात प्रकारांतील ५६, डब्ल्यूएजी नऊ प्रकारांतील २९, डब्ल्यूसीएम सहा प्रकारांतील दोन आणि डब्ल्यूएपी सात प्रकारांतील ३९ इंजिने आहेत. मागील वर्षात शेडमध्ये डब्ल्यूएपी सात प्रकारांतील २२ इंजिने हाताळण्यात आली. या डब्ल्यूएपी सात लोकोमध्ये हॉटेल लोड कन्व्हर्टर तंत्रज्ञानाची सुविधा असून, ती डब्यांना वीजपुरवठा करण्यासाठी आणि डिझेल व पॉवर कारची आवश्यकता दूर करण्यासाठी प्रदान केली जाते.
प्रारंभी ईए-१ आणि ईएफ -१ प्रकारातील डीसी लोकोमोटिव्हज येथे होत्या. या शेडला डब्ल्यूसीएम -२, डब्ल्यूसीएम -३ व डब्ल्यूसीएम ४ श्रेणीची इंजिने प्राप्त झाली. ती मुंबई विभागातील प्रचलित १,५०० व्होल्ट डीसी कॅटेगरीमध्ये सुधारित करण्यात आली. नंतर डब्ल्यूसीएम ५ वर्गातील इंजीन या शेडच्या ताफ्यात आले. कल्याण येथील इंजीन घाटात चढताना अथवा उतरताना मेल, मालगाड्यांना अतिरिक्त पॉवर पुरवतात. १९७१ मध्ये डब्ल्यूसीजी -२ इंजीन येथे आणण्यात आले. त्याला गतिमान ब्रेकिंगची वैशिष्ट्ये होती. २००७ नंतर मुंबई विभागाच्या उत्तर पूर्व विभागातील घाटात एसीमध्ये केटेनरी रूपांतराची प्रक्रिया सुरू झाली. डब्ल्यूएजी-७ आणि डब्ल्यूएजी-५ इंजिने सादर करण्यात आली. कल्याण ईएलएसच्या टीमची विविध इंजिने हाताळण्याची क्षमता लक्षात घेता नवीन तंत्रज्ञान असलेले आयजीबीटी कन्व्हर्टरसह पूर्णतः एसी लोकोमोटिव्ह डब्ल्यूएजी ९ येथील ताफ्यात जोडले गेले.
लॉकडाऊनकाळातही ईएलएस, कल्याणने शेडची कामे चालू ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे रेल्वे बोर्ड व रेल्वेमंत्र्यांनीही ईएलएसच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पण वृत्तीचे कौतुक केले. कर्मचारी देखभाल दुरुस्तीबाबत मेहनत घेत असून त्यामुळे लाेकाेशेडमध्ये येणाऱ्या लाेकाेमाेटिव्ह तंदुरुस्त राहत आहेत. कर्मचाऱ्यांच्या या मेहनतीने हे लाेकाेशेड यशस्वीपणे सुरू आहे.
पुश-पुल तंत्रज्ञानात महत्त्वाची भूमिका
- कल्याण : येथील इलेक्ट्रिक लोको शेडच्या ताफ्यात अपघात निवारण ट्रेन व हायस्पीड-सेल्फ प्रोपेल्ड अपघात रिलिफ ट्रेन आहेत. मुंबई विभागातील अपघात, रुळांवरून घसरण्यासारख्या इत्यादी घटनांच्या वेळी येथील पथकाने नेहमीच उल्लेखनीय काम केले आहे.
- मागील वर्षी ईएलएस, कल्याणने राजधानी एक्स्प्रेस आणि एचओजी चालविणाऱ्या गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पुश-पुल तंत्रज्ञानात भारतीय रेल्वेच्या तांत्रिक अपग्रेडेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.