डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये मोठी आग; कचरा पालापाचोळा जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 01:57 PM2022-03-04T13:57:32+5:302022-03-04T14:06:53+5:30
Dombivli Fire : कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
डोंबिवली - डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात अनेकदा लहान मोठ्या दुर्घटना घडत असतात. शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजता परिसरात कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. सर्व्हिस रोडवरील मोनार्च सोसायटी आणि वंदे मातरम् उद्यानजवळ मोठ्या प्रमाणात कचरा व झाडांचा पालापाचोळा पडलेला होता. या कचऱ्याने अचानक पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागलेल्या जागेखालून उच्च दाब पेट्रोलियम उत्पादन पाईपलाईन, मुंबई - मनमाड पाईपलाईन जात असून तसा चेतावणी (Warning) असा बोर्ड लावण्यात आला आहे. तसेच या जागेवरून हायटेन्शन वायर जात आहे. सुदैवाने येथील काही नागरिकांनी मिळून पाणी टाकून आग विझविण्यात यश मिळविले. या आगीमुळे जवळचा झाडांना फटका बसला आहे अशी माहिती स्थानिक नागरिक राजू नलावडे यांनी दिली. नागरिक कचरा आणि पालापाचोळा, नारळाचा झाडाचा झावळ्या इत्यादी मोठ्या प्रमाणात टाकत असतात. केडीएमसी पण याकडे गांभीर्याने पाहत नाही असा आरोप होत आहे.
जर या आगीमुळे जमिनीखालील पाइपलाईनपर्यंत आग धुमसून गरम होऊन काही ठिणगी लागली तर मोठी दुर्घटना झाली असती. याला येथे कचरा टाकणारे बेजबाबदार नागरिक, केडीएमसी, एमआयडीसी हे जबाबदार राहतील. यापुढे केडीएमसीने अशा कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कडक कारवाई करावी.
- राजू नलावडे, स्थानिक नागरिक