साहेब इथं ही राबवा स्वच्छता मोहीम! मलंगरोडला डम्पिंगची अवकळा, कचऱ्यात प्लास्टिकचा खच
By प्रशांत माने | Published: October 6, 2023 05:02 PM2023-10-06T17:02:11+5:302023-10-06T17:03:25+5:30
केडीएमसीकडून शून्य कचरा मोहीमेंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु आजही बहुतांश ठिकाणी कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे.
कल्याण: २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने रविवारी सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत यात सक्रिय सहभाग घेतल्याचे कल्याण डोंबिवलीतही पाहायला मिळाले. दरम्यान वास्तव पाहता ही मोहीम प्रतिदिन मलंगरोड परिसरात राबविण्याची गरज आहे. याठिकाणी नागरीकांची रस्त्यावर कचरा टाकण्याची वृत्ती कायम राहीली असताना हा कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने या रोडला डम्पिंगची अवकळा आली आहे.
केडीएमसीकडून शून्य कचरा मोहीमेंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु आजही बहुतांश ठिकाणी कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. या कच-यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असताना भटके श्वान आणि गायींचा संचार वाढला असून, श्वान चावाचा धोकाही वाढला आहे. साचणा-या कच-याच्या ढिगा-यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा पडलेला खच पाहता प्लास्टिकबंदीलाही हरताळ फासला गेल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान पुर्वेतील मलंगरोड हा कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण बनला आहे का? असा सवाल वास्तव पाहता उपस्थित होतो.
दररोज जमा होणारा कचरा वेळेवर आणि नियमितपणे उचलला जात नसल्याने या भागाला डम्पिंगचे स्वरूप आले आहे. कचरा दूरवर पसरला असताना या ठिकाणी पडलेल्या कच-यात सर्वत्र प्लास्टिकच पाहायला मिळत आहे. यावरून प्लास्टिकबंदीचा फज्जा उडाल्याचे इथेही स्पष्ट होत आहे. रस्त्यावर कचरा टाकणारे नागरिक जसे या परिस्थितीला जबाबदार आहेत. त्याचबरोबर कचरा वेळेवर व नियमितपणे उचलण्यात हयगय करणारे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन आणि खाजगी कंत्राटदारही तितकेच कारणीभूत आहेत. कच-यामुळे परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रवही वाढला आहे. रस्त्याच्या कडेला डम्पिंगची अवकळा पाहता आयुक्त साहेब इथे ही स्वच्छता मोहीम राबवाच असे म्हणणे अतिशयोक्तिचे ठरणार नाही.