दिव्यांगत्वाचा फायदा उठवित तो करीत होता लूटमारी; मानपाडा पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या
By प्रशांत माने | Published: December 22, 2023 06:51 PM2023-12-22T18:51:24+5:302023-12-22T18:54:10+5:30
हे दोघेही मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत.
डोंबिवली: महिलेच्या गळयातील ७२ हजार रूपये किमतीची सोन्याची चेन खेचून लंपास करणा-या दुचाकीवरील दोघा चोरट्यांना पकडण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. महत्वाचे म्हणजे दोघा चोरटयांपैकी एकजण कमरेपासून खाली पुर्णपणे दिव्यांग आहे तर दुसरा चोरटा त्याला दुचाकीवर पाठीमागे बसवायचा आणि दिव्यांग असलेला चोरटा चेन स्नॅचिंग करायचा असे पोलीस तपासात समोर आले आहे.
डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा हद्दीतील विजय सेल्सच्या समोरून आपल्या मुलीबरोबर जात असलेल्या वसंताकुमारी नायर या महिलेल्या गळयातील चेन दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १७ डिसेंबरला दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे आणि प्रशांत आंधळे यांचे पथक नेमले होते.
पथकांनी सीसीटिव्ही कॅमेरांचा आधार घेऊन तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे दोेघा चोरटयांना रायगड जिल्हयातील माणगाव परिसरातून अटक केली. विरू देवेंद्र राजपुत (वय २३) आणि सुखविर ओमप्रकाश रावल ( वय २८ ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सुखविर हा कमरेपासून खाली दिव्यांग आहे. तो बाईकवर मागे बसायचा आणि विरु हा मोटारसायकल चालवायचा. संधी मिळताच सुखविर हा महिलांच्या अंगावरील दागिने खेचायचा. त्यानंतर दोघेही मोटारसायकलवरून पसार व्हायचे.
चेन खेचायचे सुखविरला मिळायचे, पाच लाख रूपये
हे दोघेही मुळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. या दोघांनी डोंबिवली मानपाडा, खांदेश्वर, पनवेल शहर आणि रोहा या पाच शहरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक होनमाने यांनी दिली. या दोघांकडून सहा लाख ३२ हजार २१० रूपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्हे करण्यासाठी वापरलेली ९० हजार रूपयांची मोटारसायकल असा सात लाख २२ हजार १२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुखविर हा दिव्यांग आहे परंतू तो मोटारसायकलवर पाठिमागे बसून महिलांच्या गळयातील सोन्याची चेन खेचायचा. याचे त्याला पाच लाख रूपये मिळायचे त्याला डोंबिवली शहराची माहिती देखील होती अशीही माहीती तपासात समोर आली आहे.