‘त्या’ पाच दलालांना सात दिवसांची कोठडी; बांग्लादेशी मुलींना डांबून सुरू होता देहव्यापार
By प्रशांत माने | Published: October 9, 2023 05:08 PM2023-10-09T17:08:13+5:302023-10-09T17:08:25+5:30
सर्व आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
डोंबिवली: ग्रामीण भागातील हेदूटणे परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा सामाजिक संस्थेच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी भांडाफोड केला. या प्रकरणात पोलीसांनी सात पीडित मुलींची सुटका करताना पाच दलालांना बेड्या ठोकल्या आहेत. ज्याठिकाणी सेक्स रॅकेट चालू होते त्या बंगल्याच्या मालकाला देखील अटक केली आहे. सर्व आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बांग्लादेशातील एन. जी. ओ. अधिकारी मुक्ता दास यांनी महिला आणि मुलींची देह व्यापारातून सुटका करणा-या पुण्यातील फ्रीडम फर्म या संस्थेला ई-मेल करून कळविले की एका १९ वर्षीय बांग्लादेशी तरूणीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने भारतात आणले गेले असून तीला ठाणे जवळील हेदुटणे नावाच्या गावामध्ये खोलीत डांबुन ठेवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले जात आहेत. या ई-मेल चे गांभीर्य ओळखून फ्रीडम फर्म संस्थेच्या समाजसेविका शिल्पा वानखेडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पुण्याहून ठाणे गाठले. याबाबत ठाणे अँटी ह्यूमन ट्राफिकिंग सेलसह डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांना माहिती देण्यात आली.
कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी मिळालेल्या माहीतीनुसार तत्काळ डोंबिवली ग्रामीण मधील हेदूटणे येथील एका बंगल्यावर छापा टाकून तेथून सात बांग्लादेशी मुलींची सुटका केली. या मुलींकडे चौकशी केली असता युनिस शेख उर्फ राणा (वय ४०) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने या सर्व मुलींना नोकरी व उपचाराचे आमिष दाखवून बांगलादेशातून भारतात आणल्याची माहिती समोर आली. भारतात आणल्यानंतर युनिस ने सातही मुलींना हेदुटणे येथील एका बंगल्यात डांबून ठेवले आणि मुलींना देहव्यापार करण्यास भाग पाडले होते.
झाडा-झुडुपांमध्ये घेतला आश्रय
राणा व त्याचे साथीदार पलावा सिटीमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. पोलीस आपल्या मागावर असल्याची माहिती मिळताच संबंधितांनी अंतर्ली गावाबाहेर असलेल्या झाडा-झुडपांमध्ये आश्रय घेतला. मध्यरात्री दोन ते पहाटे सहा दरम्यान सुरू असलेल्या सर्च आपरेशनमध्ये पोलिसांनी पाठलाग करत मोठ्या शिताफीने पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या. हे सर्व आरोपी बांग्लादेशी आहेत.
बंगल्याचा मालकही जेरबंद
योगेश काळण याच्या हेदुटणे येथील एक मजली बंगल्यामध्ये सेक्ट रॅकेट चालायचे. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. घटनास्थळी २५ संशयित आधार कार्ड, १० पॅन कार्ड, ४ जन्म दाखले बांग्लादेशी तसेच भारताच्या चलनी नोटा जप्त केल्यात.