कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत तब्बल 78 हजार अनधिकृत झोपड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:00 AM2020-12-16T00:00:15+5:302020-12-16T00:00:31+5:30
महिन्याला दोन हजार रुपये भाडे : सरकारी, खासगी जागांवरही बस्तान; पुनर्वसन कागदावरच
- मुरलीधर भवार
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत ७८ हजार झोपड्या आहेत. त्यापैकी एकही झोपडी अधिकृत नाही. त्यामुळे तिला पाणी, वीज हीदेखील बेकायदा दिली जाते. राजकीय लोकांना त्यांच्या व्होट बँका तयार करून त्या जोपासायच्या असतात. त्यामुळेच झोपड्या वाढतात, असा आरोप असला, तरी त्यासाठी सरकारच्या योजनाही कागदावरच असल्याने शहराच्या नागरिकरणात झोपड्यांची भर दरवर्षी पडत असते.
मनपा हद्दीत सरकारी जमिनीवर अधिक झोपड्या आहेत. तसेच खासगी जागेवरही झोपड्या आहेत. सरकारी जागेवर झोपड्या बसतात, त्याला झोपडपट्टी दादा जबाबदार असतात. झोपडपट्टी दादा ॲक्ट अस्तित्वात असला, तरी आजही झोपडपट्टी दादांचे काम छुप्या पद्धतीने सुरूच असते. पोटापाण्यासाठी अनेक राज्यांतून अनेक मजूर हे मुंबई नगरीत स्थलांतरित होतात. त्यांना मुंबईत घर घेणे शक्य नसते. त्यामुळे ती मंडळी मुंबईच्या उपनगरात धाव घेतात. कल्याण हे रेल्वेचे जंक्शन असल्याने येथे स्थलांतरित व विस्थापितांचा भरणा जास्त आहे. त्यामुळेच कल्याणमध्ये झोपड्यांची संख्या वाढते आहे. खासगी जागा मालक काही प्रसंगी त्याला विरोध करतात. काही प्रसंगी भाड्याच्या स्वरूपात उत्पन्न मिळणार असल्याने त्यांचे समर्थन असते.
लॉकडाऊननंतर वीजबिलात वाढ केल्याने मालकाने घरात बल्ब, ट्यूब, पंखा या सगळ्याचे मिळून पाचशे रुपये वेगळे घेतले. पाण्यासाठी महिन्याला २०० ते ५०० रुपये आकारले जातात. एका लहान झोपडीत राहण्यासाठी आम्हाला महिन्याला किमान तीन हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. - झोपडीधारक
झोपडीत राहण्याचा एक धोका असतो. ही झोपडपट्टीची वस्ती असल्याने कामावर गेल्यावर याठिकाणी जीवनावश्यक गृहपयोगी वस्तूंची चोरी होते. त्यामुळे कामावर गेल्यावर मनात सारखी एक धाकधूक असते. घरी चोरी तर होणार नाही ना. त्याचबरोबर अनेक समस्याही आहेत.
- झोपडीधारक
मनपाने झोपडीधारकांसाठी वाल्मीकी आंबेडकर घरकुल योजनेअंतर्गत ३५० घरे बांधली होती. बीएसयूपी योजनेत ७ हजार घरे बांधली. त्यापैकी १५०० जणांना घरे दिली. ८४० घरे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर बाधितांना दिली आहेत. ३ हजार घरे पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित केली आहे. उरलेल्या घरांचे वाटप अद्याप झालेले नाही. त्यामुळे ७८ हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन झालेले नाही.
- सुनील जोशी, कार्यकारी अभियंता, गृहनिर्माण प्रकल्प, केडीएमसी
वीज, पाणी कसे मिळते?
अनेक झोपडीधारक ज्यांच्याकडून झोपडी घेतात, त्यांना वीज व पाण्याची व्यवस्था करा, असे सांगतात. झोपडी मालकाकडे विजेचे कनेक्शन असले तर त्याच्याकडून वीजपुरवठा घेतला जातो. त्याच्याच नळावर पाणी भरले जाते. काही ठिकाणी बोअरिंग, विहीर अथवा दूरवरून झोपडीधारक पाणी आणतात. एका झोपडीचे भाडे आजमितीस १ ते २ हजार रुपये आहे. झोपडीचा आकार लहान असेल तर महिन्याला १ आणि मोठी असेल २ हजार रुपये आकारले जाते.