स्वच्छता आणि पर्यावरणासाठी भित्तीचित्र स्पर्धेला शेकडो बालचित्रकारांनी लावली हजेरी
By अनिकेत घमंडी | Published: December 4, 2023 05:25 PM2023-12-04T17:25:06+5:302023-12-04T17:26:28+5:30
स्वच्छ डोंबिवली ' आणि ' खाडी प्रदूषण या विषयावर चित्रकला रोटरी सर्व्हिस वीक२०२३ अंतर्गत समजसेवी प्रकल्प.
डोंबिवली: जगभरात ज्या पर्यावरण रक्षणाच्या जागरूकतेसाठी सातत्याने चर्चा केली जात आहे त्याच विषयाची जागृती नव्या पिढीत व्हावी या उद्देशाने डोंबिवलीतील पाच रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने ' स्वच्छ डोंबिवली ' आणि ' खाडी प्रदूषण ' या दोन संवेदनशील विषयांवर शालेय विद्यार्थ्यासाठी रविवारी भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गणेश मंदिराच्या वक्रतुंड सभागृहात सकाळी ८-३० वाजता सुरू झालेल्या या पोस्टर स्पर्धेत शंभर मुलामुलींनी भाग घेतला होता, आणि त्या प्रसंगी विविध यजमान संस्थांचे प्रतिनिधी आणि पालक आणि शिक्षकही उपस्थित होते. जाहीर निकालसंदर्भात सोमवारी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली.
रोटरी या जागतिक पातळीच्या सेवाभावी संस्थेच्या जगभरातील असंख्य शाखांच्या माध्यमातून ही संस्था समाजसेवी प्रकल्पांचे कार्य अविरतपणे करत असते. रोटरी सर्व्हिस वीक२०२३ अंतर्गत समजसेवी प्रकल्पांची एक स्तुत्य मालिका आठवडाभर यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. डोंबिवलीतील पाच रोटरी क्लबनी एकत्र येऊन येथील पर्यावरण दक्षता मंच यांच्या सहकार्याने एक महत्त्वाचा आणि सामाजिक जागृतीचा प्रकल्प रविवारी गणेश मंदिर संस्थानच्या सभागृहात संपन्न केला. कल्पकतेची आणि रंगछायेची कमालीची जाण दाखवणाऱ्या अनेक विद्यार्थीगणात दोन विशेष चित्रकार विद्यार्थ्यांचाही समावेश असून त्यांचा औचित्यपूर्ण सत्कार या सोहळ्यात करण्यात आला. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या स्पर्धेच्या मध्यांतरात रोटरीचे ज्येष्ठ सदस्य श्रीपाद कुलकर्णी यांनी उपस्थितांची चाहापानाची सोय केली होती.
प्रकल्पाच्या अखेरीस परीक्षक विराज काळे, प्रल्हाद देशपांडे, आणि रुपाली शाईवाले मंडळींनी त्वरित विजेत्या स्पर्धकांची नावे निवडली. आणि श्री दशरथ डोंगरे ह्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. सातवी ते नववी इयत्तांच्या या सहभागी चित्रकार विद्यार्थ्यांमधून चार उत्तेजनार्थ आणि प्रथम , द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी रुपाली शाईवाले, समीक्षा , रोटरी क्लब ऑफ वेस्टचे अध्यक्ष दीपक काळे , मंदार कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, डॉ .प्रल्हाद देशपांडे , रोटरी डिस्ट्रिक्टचे सचिव दशरथ डोंगरे, रो.संजीव जोशी, इंडस्ट्रियल क्लबचे महेंद्र भोईर, रिजन्सी इस्टेट क्लबचे अध्यक्ष विशाल करकमकर, फिनिक्स क्लबचे अध्यक्ष सचिन खुटाळ, हेरिटेज क्लबचे अध्यक्ष समीर ठाकूरदेसाई, वाकळण गावातील पोसू बाळा पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यासोबत शिक्षक किशोर चौधरी यांनीही हजेरी लावली.