..तरच या पिढीतले अंतर कमी होईल: प्रणव भांबुरें
By सचिन सागरे | Published: April 22, 2024 04:49 PM2024-04-22T16:49:21+5:302024-04-22T16:51:18+5:30
सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ.
सचिन सागरे, कल्याण : झगमगाटी दुनियेत चमकणारे कलावंत आपल्याला दिसतात. पण त्यामागे त्यांनी घेतलेले अविरत श्रमही लक्षात घेतले पाहिजेत. पालकांनीही या पिढीच्या मनापर्यंत पोहचण्याकरिता त्यांना आपुलकीने जवळ घेतले पाहिजे तरच या पिढीतले अंतर कमी होईल असा मोलाचा सल्ला निवेदक व मराठी कलाकार प्रणव भांबुरे यांनी सार्वजनिक वाचनालयकल्याण आयोजित “चला ऐकुया गोष्टी आजींच्या” या बालशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बालगोपाळांना दिला. प्रचंड उत्साहात ६० ते ७० बाळगोपाळांनी शिबिरात सहभाग नोंदविला आहे.
मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस्कारांची पायाभरणी करणे गरजेचे आहे. अनेक कलावंताना घडविण्याचे महतकार्य सार्वजनिक वाचनालय कल्याणने केले आहे. वाचन परंपरा जपण्याबरोबरच बालशिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीशीही नाळ वाचनालयाने जोडून ठेवली आहे.
वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती व बालशिबिर आयोजनाचा मानस सहग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
सोमवारपासून ३० एप्रिलपर्यंत चालणाऱ्या शिबिरात प्रार्थना, गाणी, गोष्टी, मातीकाम, कापडी तसेच कागदी फुले बनविणे, पॉट पेंटिंग, फुलांची रांगोळी तसेच इतर विविध प्रकारचे पारंपरिक खेळ घेण्यात येणार आहेत.
वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, शिबिराच्या प्रमुख वर्षा माने, ज्येष्ठ वाचक सभासद विजयसिंह परदेशी, सुनिता मोराणकर, शुभदा जोशी, अनुष्का गोलिपकर, वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी देवळे, ग्रंथसेविका, पालक वर्ग, वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.