"ज्ञानभाषा, 'भाकरीची' भाषा झाल्याशिवाय मराठी भाषेचे संवर्धन होणार नाही"
By मुरलीधर भवार | Published: December 20, 2023 04:19 PM2023-12-20T16:19:21+5:302023-12-20T16:19:45+5:30
आगरी महोत्सवात डॉ. श्रीपाल सबनीस आणि डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत.
डोंबिवली : मराठी ही ज्ञान व रोजगारस्नेही आणि 'भाकरी'ची भाषा होणार नाही, तोपर्यंत मराठीकडे नव्या पिढीचा कल झुकणार नाही. मराठी ज्ञानभाषा करण्याबरोबरच वाचन संस्कृती वृद्धींगत केल्याशिवाय मराठीचे संवर्धन होणार नाही, असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस आणि डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
डोंबिवलीत सुरू असलेल्या १९ व्या आगरी महोत्सवात `मराठी भाषा संवर्धन व जतन' या विषयावर बुधवारी सायंकाळी परिसंवाद भरविण्यात आला होता. या परिसंवादात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सबनीस आणि डॉ. देशमुख यांच्यासह मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे आदींनी सहभाग घेतला. आगरी महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. दिपाली केळकर यांनी साहित्यिकांबरोबर संवाद साधला.
डॉ. सबनीस म्हणाले, "महाराष्ट्रात स्मशाने सुंदर पण मराठी भाषा भकास अशी स्थिती दिसून येते. ज्ञानाचा प्रसार करणारी वाचनालये सुंदर करायला हवीत. त्यांना भरघोस मदत देण्याऐवजी राज्य सरकार अ, ब, क आणि ड वर्ग अशी वाचनालयांची उपेक्षा करीत आहेत. वाचनालये जगली, तर मराठी जगेल. मराठी शाळा बंद पडण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. इंग्रजी शाळांचे स्तोम वाढत असून, ते कमी होणार नाही. सध्या श्रीमंतांची इंग्रजी शाळा व गरीब मजूर आणि सामान्यांची मराठी शाळा अशी वर्गवारी झाली. भविष्यात गरीब माणूसच मराठी टिकवू शकेल. मराठीचे वैभव सिद्ध करण्यासाठी जनजागरण करण्याची गरज आहे."
महाराष्ट्रातील मेट्रो शहरांसह मोठी शहरे अमराठी होत आहे. प्रसिद्ध साहित्यिक पु. भा. भावे, शं. ना. नवरे यांच्या डोंबिवलीची अवस्थाही हळूहळू तशी होत आहे.
मराठी ही राजभाषा आहे. परंतु, ज्ञान, उद्योग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये इंग्रजीचे प्रभूत्व आहे. ज्ञानभाषेच्या नावाखाली आपण नतद्रष्टपणामुळे मराठी नष्ट करीत आहोत. चीन, जपान आणि इस्त्राईलप्रमाणे सर्व विज्ञान व तंत्रज्ञान हे मराठी भाषेत आणण्यासाठी प्रयत्न हवेत. अन्य भाषांतील उच्च दर्जाच्या साहित्याचे मराठीत भाषांतर करायला हवे. त्याचबरोबर शाळां-शाळांमध्ये वाचन संस्कृती वृद्धींगत करण्याची गरज आहे. परराज्यात मराठीचा प्रसार करणाऱ्या ग्रंथालयांनाही मदतीचा हात द्यावा, असे मत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले.
डोंबिवलीत एकेकाळी ४२ वाचनालये होती. मात्र, आता एखाद-दुसरा वगळता अन्य वाचनालये बंद पडली आहेत, याकडे लक्ष वेधत सुरेश देशपांडे यांनी मराठीच्या संवर्धनासाठी विविध सूचना केल्या.
यांना मिळाला पुरस्कार
यावेळी आगरी युथ फोरमच्या वतीने आगरी भाषेच्या प्रसारासाठी लेखनाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या लेखकांना स्व. श्री नकूल पाटील स्मृती साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लेखक श्याम माळी, मोहन भोईर, गजआनन म्हात्रे, प्रकाश हरिश्चंद्र पाटील, दशरथ तुकाराम मुकादम, दयानंद एकनाथ नाईक यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
आगरी महोत्सवात एक दिवस साहित्याचा
साहित्य संमेलनासारख्या भव्य आगरी महोत्सवात एक दिवस हा आगरी भाषेसाठी राखीव ठेवावा, अशी सूचना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सबनीस आणि डॉ. देशमुख यांनी केली होती. त्यानुसार पुढील वर्षाच्या आगरी महोत्सवात एक दिवस आगरी साहित्यासाठी ठेवण्याबाबत नक्की विचार करू, असे संयोजन समितीचे अध्यक्ष वझे यांनी जाहीर केले.