Marathi Sahitya Sammelan : नाशिकच्या साहित्य संमेलनात कल्याणातील शिक्षणतज्ज्ञ करणार आत्मक्लेश उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 05:15 PM2021-12-03T17:15:05+5:302021-12-03T17:19:32+5:30
Marathi Sahitya Sammelan: महेंद्र गौरीकुमार बैसाणे, असे या शिक्षण तज्ज्ञाचे नाव आहे. कोरोना काळात शासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण : सध्या नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. कल्याणात राहणाऱ्या शिक्षणतज्ज्ञाने राज्य सरकारच्या निषेधार्थ आजपासून या संमलेनामध्ये आत्मक्लेश उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्र गौरीकुमार बैसाणे, असे या शिक्षण तज्ज्ञाचे नाव आहे. कोरोना काळात शासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महेंद्र बैसाणे हे आकाशवाणी-दूरदर्शनमधील वर्ग-२ ची नोकरी सोडून ‘विद्यार्थी आत्महत्या, करिअर कौन्सिलिंग’ या विषयांमध्ये कार्यरत आहेत. तर कोरोना काळात आपण अनेक व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यथा शालेय शिक्षण विभाग, सांस्कृतिक विभाग, उद्योग विभाग आणि इतर मान्यवरांकडे असंख्यवेळा पत्रव्यवहाराद्वारे मांडल्याची माहिती महेंद्र बैसाणे यांनी दिली. तसेच आपण शासन दरबारी सतत पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून कोणतीही उचित दखल घेतली गेली नाही किंवा कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या कारणास्तव नाशिकमध्ये आजपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कोणताही मोडता न घालता सोमवार ६ डिसेंबरनंतर आत्मक्लेश म्हणून उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बैसाणे यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे ही माहिती कळवली असून याप्रश्नी संबंधितांना योग्य ते आदेश देण्याची विनंती केली आहे.