गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील मार्केट हाऊसफुल्ल; ना मास्क,ना सोशल डिस्टेंसिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 02:46 PM2021-09-09T14:46:12+5:302021-09-09T14:46:25+5:30
पोलीसांचे रस्त्यावर उतरत नागरिकांना आवाहन
कल्याण: गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्यानं सर्वत्र लगबग सुरु झाली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी स्टेशन परिसर, शिवाजी चौक आणि एपीएमसी मार्केटमध्ये नागरिकांची तोबा गर्दी झालेली पाहायला मिळाली. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व कुटुंब खरेदीसाठी बाहेर पडल्याचं चित्र होतं. अनेक ठिकाणी तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. सोशल डिस्टन्सिंग तर सोडाच पण मास्क परिधान करायचं भानही अनेकांना राहिलं नव्हतं. एकंदरीतच शहरातील हे चित्र पहाता कोरोनां अक्षरशः या गर्दीत चेंगरला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सण उत्सव नक्कीच साजरे झाले पाहिजेत. मात्र सद्यपरिस्थिती पाहता कोरोनाची टांगती तलवार आपल्यावर आहेच हे देखील नाकारता येणार नाही. गुरुवारी सकाळपासून नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्यानं शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पत्री पुलावरही तासनतास गाड्या एकाच ठिकाणी उभ्या होत्या. एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे मार्केट मध्ये होणारी गर्दी पाहता पोलिसांनाच रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करावं लागलं.
आता आपल्या मनांत सहाजीकच प्रश्न निर्माण झाला असेल की, राजकीय कार्यक्रमाना देखील गर्दी होते..अर्थातच हा प्रश्न निर्माण केला जाणं रास्त आहे. मात्र गेल्या दोन कोरोनां लाटांचा अनुभव घेता औषध, बेड, ऑक्सीजन आणि आता लसीकरणासाठीही सर्वसामान्य कल्याण डोंबिवलीकरांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.. अनेकांनी जवळची माणस गमावली, अनेक कुटुंब उध्वस्त झाली. आता तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता.. आपण स्वतःची आपल्या कुटुंबाची काळजी घेणं इतकंच आपल्या हातात आहे.