एसटीच्या चालक-वाहकांनाच मास्कचे वावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 11:55 PM2021-02-10T23:55:15+5:302021-02-10T23:55:36+5:30
श्वास घेण्यास होतो त्रास : शहरांतील प्रदूषणामुळे जीव होतो घाबराघुबरा
कल्याण : कोरोनामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी असे वारंवार सरकारकडून सांगितले जाऊनही अनेकजण नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. श्वास घ्यायला त्रास होतो असे सांगून प्रवासाच्यावेळी मास्क घालणे टाळतात असे दिसून आले आहे.
कल्याण-डोंबिवली आगारातील चालक-वाहकही कामाच्याठिकाणी मास्क घालताना दिसले नाही. मास्क घातले की श्वास घेण्यास त्रास होतो, असे त्यांनी सांगितले. रस्ते यांची दुरवस्स्था झाल्याने धूळ नाकातोंडात जाऊन जीव नकोसा होतो. त्यातच मास्क घातले तर जीव घाबराघुबरा होतो अशी कारणे सांगण्यात आली. मास्क घालायला पाहिजे हे आम्हाला मान्य आहे, पण वरील कारणांमुळे घालत नाही. काही प्रवासीही विनामास्क फिरताना दिसत होते.
बस चालवताना तोंडावर मास्क असल्याने श्वास कोंडला जातो. त्यातच डोंबिवली शहरात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यात मास्क घातले तर अधिकच त्रास होतो. या कारणांमुळे मास्क घालत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मास्क घालणे हे प्रकृतीसाठी चांगलेच आहे, पण श्वास कोंडत असल्याने ते घालण्याचे टाळतो.
- मास्क न घातलेला, चालक
माझे ह्रदयाची छोटी शस्त्रक्रिया झाली असल्याने मास्क घातल्यास दम लागतो, धाप लागते. यामुळे मी मास्क घालणे टाळतो असे कल्याण आगारातून प्रवास करणाऱ्याने सांगितले. कोरोनाचे नियम पाळा हे वारंवार सांगितले जाते, ते अगदी बरोबर आहे. पण माझ्यासारख्या रुग्णाला सतत मास्क घातल्यास ते अधिक त्रासदायकच ठरते.
- मास्क न घातलेला, प्रवासी
कल्याण-डोंबिलीतील प्रदूषण आणि त्यातच रस्त्यांची सुरु असलेली कामे, धुळीचे साम्राज्य यामुळे मास्क न लावताच सतत कोंडल्यासारखे जाणवते. त्यातच जर मास्क घातला तर जीव घाबरा होतो. यामुळे ड्युटीवर असताना मास्क घालणे टाळतो. सध्याच्या काळात मास्क घालणे हे गरजेचे आहे, असे पटते. पण श्वास कोंडत असल्याने ते टाळतो.
- मास्क न घातलेला, वाहक