गझल इंग्रजीत भाषांतरीत करणाऱ्या मसूद पेशइमाम यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन
By मुरलीधर भवार | Published: September 3, 2022 08:19 PM2022-09-03T20:19:26+5:302022-09-03T20:20:01+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील मसूद यांनी शिक्षक होणे पसंत केले.
कल्याण- उर्दू गझल इंग्रजीत भाषांतरीत करणारे अॅड. मसूद पेशइमाम यांचे कर्करोगाच्या आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते ७२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कल्याणच्या काझी दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील मसूद यांनी शिक्षक होणे पसंत केले. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केल्यावर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यांनी न्याय हक्कासाठी कायद्याचे शिक्षण घेतले. ते वकील झाले. वकील झाल्यावर त्यांनी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग केला. त्यांनी पाच वर्षे पत्रकारीताही केली. त्यांनी द न्यू ब्रेक नावाचे इंग्रजी साप्ताहिक काढले होते. पाच वर्षानी हे साप्ताहिक बंद पडले. त्यानंतर त्यांनी इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, एशियन एज, फ्री प्रेस जर्नलमधून मुक्त पत्रकारिता केली. त्यांचे विविध विषयावरी लेख इंग्रजी वृत्तपत्रतून प्रसिद्ध झाले.
उर्दू भाषेवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांचे उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी प्रख्यात शायर इरतेजा निशाद यांच्या २०० गझलांचे इंग्रजीत भाषांतर केले होते. इंग्रजी ही भाषा जगाकडे पाहण्याची खिडकी आहे. त्या दृष्टीने गझल सगळ्य़ा जगातील इंग्रजी जाणणाऱ्यांना कळावी. तिची नजाकत काय आहे, तो काव्य प्रकार काय आहे याची माहिती व्हावी यासाठी त्यांनी हे उर्दू गझलांचे भाषांतर इंग्रजीत केले होते. समाजात हिंदू मुस्लीम सलोखा राहावा यासाठी त्यांनी पोलिसांच्या शांतता कमिटीवरही काम पाहिले.
त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला निष्पन्न झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने एक चांगला शिक्षक, वकील, पत्रकार, उर्दू भाषा प्रेमी आणि सामाजिक जाण असलेला कार्यकर्ता हरपला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.