डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 02:39 PM2024-05-23T14:39:15+5:302024-05-23T15:07:41+5:30
डोंबिवली एमआयडीसीमधील एका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
Dombivli MIDC Blast :डोंबिवली एमआयडीसीमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. एमआयडीसी फेज-२ मधील एका कंपनीत हा भीषण स्फोट झाला आहे. एमआयडीसी फेस दोन मधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात कंपनीतील पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटानंतर अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतीच्या काचा देखील फुटल्या आहेत.
डोंबिवलीच्या एमआयडी फेज २ मध्ये हा भीषण स्फोट झाला आहे. एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये बॉयलर फुटल्याने हा स्फोट झाल्याचे म्हटलं जात आहे. या स्फोटानंतर आजूबाजूच्या अनेक इमारतींना हादरेही बसले आहेत. तर अनेक दुकानांसह, इमारतींच्या काचाही फुटल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अमुदान केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग इतर कंपन्यांमध्ये पसरली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या कंपन्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.
भीषण स्फोटामुळे एमआयडीसी परिसरात आगीचे लोळ आणि धुराचे लोट पसरले आहेत. अमुदान केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या कंपनीमध्ये ही आग पसरली आहे. त्यामुळे या कंपन्यांमधून स्फोटाचे लहान मोठे आवाज येत आहेत. आगीनंतर बाहेर आलेल्या जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कंपनीमध्ये कोणी कर्मचारी अडकले आहेत की नाही याची माहिती समोर आलेली नाही.
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग#Dombivli#DombivliMIDC#Blast#KDMCpic.twitter.com/LLSY0VNAby
— Lokmat (@lokmat) May 23, 2024
या स्फोटानंतर आजूबाजूच्या इमारतींच्या व रस्त्यावर लावलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या. स्फोट इतका भयंकर होता की, दोन ते तीन किमी परिसरापर्यंत त्याची तीव्रता जाणवली. स्फोटानंतर रस्त्यावरर मोठ्या प्रमाणावर राख उडाली आहे . अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
"एमआयडीसीमध्ये एका कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी माझे बोलणं झालं आहे. तिथे बचाव पथक पोहोचलं आहे," अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.